आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचा मनपात राडा:मनपा अधिकाऱ्यांवर उगारली खुर्ची, दाशरथेंसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदार जोशी

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याला जबाबदार कोण, असा जाब विचारत मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवार (२६ जून) आैरंगाबाद महापालिका कार्यालयात राडा केला. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. या वेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी निकम यांच्यावर खुर्ची उगारली. त्यामुळे काही वेळ निकम यांच्या दालनात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, मनपाने प्रभारी सुरक्षा अधिकारी बाबू जाधव (५९) यांच्या फिर्यादीवरून दाशरथे यांच्यासह उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. निकम यांच्या डोक्यात खर्ची घालण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, तोंडाला मास्क न लावता धोका निर्माण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मनपा प्रशासन कोरोनाशी लढताना अनेक संवेदनशील बाबीवर अक्षम्य दुर्लक्ष, हलगर्जीपणा करीत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी मनपाने तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. कामावर रुजू होऊन सुमारे ३ महिन्यांचा कालावधी होऊनही सदर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देण्यात आले नाही. सदर डॉक्टर प्रत्यक्ष रुग्णांची कोविड चाचणी करतात.

मनपाचे स्थायी स्वरूपात नियुक्त असलेले एकही डॉक्टर हे काम करत नाहीत. याशिवाय आशा वर्कर आणि आरोग्य विभागातील रोजंदारी महिला कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हे करतात. मात्र स्थायी अधिकारी काहीच करताना दिसत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण सापडत असताना टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट यावर मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे असेही मनसेने या निवेदनात म्हटले आहे. अजून किती नागरिकांचा बळी घेणार आहात, आता तरी झोपेतून जागे व्हा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मनसेने दिला आहे. सुहास दाशरथे यांच्यासह या वेळी संदीप कुलकर्णी, अमित भांगे, प्रवीण मोहिते, वृषभ रगडे, अमित दायमा आदींची उपस्थिती होती.

अनेक दिवसांनंतर ‘मनसे स्टाइल’ आंदोलन

गेल्या काही वर्षांपासून मनसेचे मनसे स्टाइल आंदोलन शहरात झाले नव्हते. वारंवार बदलणारे पदाधिकारी त्यामुळे विस्कळीत झालेली घडी. मात्र कोरोनाच्या माध्यमातून मनसेने आपले बदलते स्वरूप या वेळी दाखवल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...