आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक भागात लावले आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांवर कारवाई होत नाही, नेत्यांना कारवाईंची भीती दाखवत भाजपमध्ये प्रवेश करायला लावतात आणि पक्षप्रवेश होताच सर्व कारवाईंपासून सुटका होते, असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे.
काय म्हणाले अक्षय पाटील?
देशात कधी नव्हे ते ऐतिहासिक बहुमताने भाजपचे सरकार आले आहे. राज्यातही त्यांचे आणि मि़त्रपक्षाचे सरकार असले तरी भाजपची भूक भागत नाहीये, भाजपकडून केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत असून आज देशातील केंद्रीय यंत्रणाचे आणि ईडीचे अध्यक्ष भाजपच्या घरगड्यासारखे वागत आहे. तर ईडीही भाजपची दुसरी शाखा झाली आहे. या गोष्टींला कंटाळून जनता त्रस्त झाली आहे, यामुळे कालपरवा भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चौकशी सुरू असल्याचे दाखवा आणि लाख रुपये मिळवा अशी ऑफर देत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आरोप केला आहे.
नुकताच शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना अर्जुन खोतकर भावुक झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी आता माझे कुटुंब अडचणीत असल्यामुळे मी निर्णय घेतोय, अशी प्रतिक्रिया खोतकरांनी दिली होती. त्यामुळे खरेच खोतकरांनी शिवसेना कुठल्या दबावामुळे सोडली का, याची चर्चा सुरू झाली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या या नव्या बॅनरबाजीने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
कोणत्या नेत्यांवर भाजपकडून आरोप
यापूर्वीही अनेकदा भाजपकडे ईडीचे वॉशिंग मशीन असल्याची टीका विरोधकांनी केली होती. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात आले होते. मात्र, भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावर कारवाई तर झाली नाहीच, उलट केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. तर विजय गावित, बबनराव पाचपुते यांची भाजपकडून आमदारपदी वर्णी लागली आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर मुंबई मनपाची जबाबदारी देण्यात आली आहे. यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नुकताच प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भावना गवळी आणि अर्जुन खोतकर अशा ईडी कारवाईचा ससेमिरा पाठी लागलेल्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या या नव्या बॅनरची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.