आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप पाहून चांगलेच मनोरंजन होत आहे. मात्र, समाजव्यवस्थेत सुधारणा व्हावी, याबद्दल कोणीच काही बोलत नाही. अशा स्थितीत सामाजिक स्थैर्य बिघडले आहे. हे स्थैर्य टिकवणे आव्हान आहे, असे मत राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी त्यांनी प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे लिखित ‘भूक’ या आत्मकथनाचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, पँथरचे नेते ज. वि. पवार, लेखक डॉ. सरवदे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. ॲड. निकम म्हणाले, सुसंस्कृत होण्यासाठी चांगले विचार आणि माध्यमाची गरज असते. माणसाला घडवण्याचे काम परिस्थिती नव्हे तर मन:स्थिती करते. शिक्षणामुळे लोक सुशिक्षित झाले असले तरी सुसंस्कृत होण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले. डॉ. मनोहर शिरसाट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. चैताली सरवदे यांनी आभार मानले. अॅड. निकमांनी दुष्टांचा संहार केला : डॉ. कसबे डॉ. कसबे म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर देशात आज अराजक निर्माण झाले आहे. अल्पसंख्याक, आदिवासी, दलित भयभीत आहेत. आपण कठीण काळातून जात आहोत. सत्ताधीशांनी टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य श्रमिक घाबरलेले आहेत. धर्माला ग्लानी येईल आणि दुष्टांची संख्या वाढेल तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी येईल, असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. पण, आपले भगवंत खोटे निघाले आणि त्यांनी दुष्टांचा संहार केला नाही. अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाने भगवंत होऊन दुष्ट अपराधींचा संहार केला हे त्यांच्या कामगिरीवरून लक्षात येते.’ असे डॉ. कसबे म्हणाले.
आत्मचरित्र दलित साहित्याची ओळख : ज. वि. पवार दलित साहित्यात कविता आणि आत्मचरित्र प्रकाराने चळवळ सुरू झाली. या साहित्याला नाकारण्याचे प्रयत्न झाले. पण, हा प्रकार रूढ होऊन दलित साहित्याची ओळख झाली. काही लेखकांनी सहानुभूती मिळवताना खोटे लेखन केले. त्यातून समाजाचे उन्नयन झाले नाही. ज्यांच्याकडे सांगण्यासारखे आहे ते लोक आता लिहू लागल्याने समाधान वाटते, असे ज. वि. पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.