आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खैरेंनी उडवला भाजपचा पतंग, मकरियेंनी दिली ढील! मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित उत्सवात शिवसेना-भाजप नेत्यांचे ‘गोड गोड बोला’

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शहरात पतंगबाजी उत्साहात झाली. आबालवृद्धांसह महिलांनीही त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे एरवी एकमेकांची ‘कन्नी’ कापण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांनीही सोबत पतंगबाजीची हौस पूर्ण करून घेतली. भाजपचे माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी आयोजित केलेल्या पतंग महोत्सवात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हजेरी लावली. मकरिये यांनीही चक्री पकडून त्यांना चांगलीच ‘ढील’ दिली

संक्रांतीनिमित्त आयोजित पतंगबाजी कार्यक्रमात भाजप-शिवसेना नेत्यांचे एकाच ठिकाणी येणे चर्चेचा विषय बनला होता. मकरिये यांच्या निराला बाजार येथील घरी आयोजित पतंगबाजी महोत्सवात सहभागी होत आमदार अतुल सावे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, बस्वराज मंगरुळे, माजी महापौर बापू घडमोडे, देवगिरी बँकेचे किशोर शितोळे, मनोज पांगारकर, समीर राजूरकर, दिलीप थोरात, मुकुंद दामोदरे, लक्ष्मीकांत थेटे, मनोज घोडके आदींनी पतंग उडवले. सायंकाळी उशिरा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हजेरी लावली.

सध्या शहरात मनपा निवडणुकीच्या तयारीची चर्चा आहे. त्यामुळे या उत्सवात पतंग उडवताना राजकीय टोलेबाजीही चांगलीच रंगली होती. निवडणुकीचे चिन्ह ‘पतंग’ असलेला एमआयएम हा पक्ष शिवसेनेचा प्रमुख स्पर्धक मानला जातो. त्यामुळे यंदा आम्हीच ‘पतंग’ कापणार असे दावे शिवसेना नेत्यांकडून केले जात होते. तसेच भाजपच्या दृष्टीने ‘एमआयएम’ प्रतिस्पर्धी नसल्याने ते फक्त एकच दिवस पतंग उडवू शकतात, अशी टोलेबाजीही करण्यात आली.

दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरेंचा ‘पतंग’ लोकसभा निवडणुकीत भाजपनेच कापला अशी मिश्कील टिप्पणी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी केली तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र त्या वेळी तनवाणी हे भाजपमध्ये होते हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अनिल मकरिये यांच्यासोबत पतंगबाजीचा आनंद लुटला.

बातम्या आणखी आहेत...