आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर MIM कडून महाविकास आघाडी युतीचा प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. एमएमआय आणि भाजप यांची छुपी युती आहे. एमएमआयकडून मांडण्यात आलेले प्रस्ताव हा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातील कल्पना आहे, अशी टीका प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी केली.
औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे खासदार जलील यांच्या भेटीसाठी औरंगाबादेत आले होते. जलील यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी टोपे औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप एमआयएमवर करण्यात आला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत शामिल होण्याचा प्रस्ताव देतोय, असे खासदार जलील यांनी टोपेंना म्हटलं.
एमआयएमसोबतच्या आघाडीची शक्यता शिवसेनेने फेटाळली
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. भाजप आणि एमआयएमची छुपी युती आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांचेच सरकार राहील. राज्यातले तीन सत्ताधारी पक्ष शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचाराने चालणारे पक्ष आहेत. ते आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात, ते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. त्यामुळे या युतीच्या अफवा आहेत, असे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.
प्रस्तावावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
एमआयएमचा हा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावलेला असतानाच एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. टोपे यांच्या या विधानावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. टोपे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत एमआयएमच्या समावेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्याने शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. शिवसेनेने जरी एमआयएमसोबतच्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली असली आणि युतीसाती राष्ट्रवादी अनुकूल असली तरी काँग्रेस काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणेंची शिवसेनेवर टीका
एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. कुणी कुणासोबत युती करो आम्हाला काही फरक पडत नाही. जनता मोदीसोबत आहे. शिवसेनेने हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाही तर जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले आहे, राज्यात सध्या अजानची स्पर्धाही त्यांनी घेतलेली आहे. त्याचा परिणाम आहे का बघू. शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्र येतात ते पाहू, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. तर नितेश राणे यांनी टि्वट करत 'वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी. कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे.आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे. खरंच, करून दाखवलं!!', या शब्दात टीका केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.