आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंचा थेट विरोध:खैरेंनी बंडोबांना दिलेला इशारा दानवेंना नामंजूर

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोर आमदार आणि त्यांच्या समर्थकांना २७ जुलैनंतर धडा शिकवू, असा इशारा शिवसेना उद्धव गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत दिला होता. त्याला आमदार अंबादास दानवे यांनी थेट विरोध दर्शवला. आम्हाला दिखाव्याचे राजकारण जमत नाही, असा टोलाही त्यांनी गुरुवारी (४ आॅगस्ट) पत्रकार परिषदेत लगावला. मनपामध्ये चार प्रभाग पद्धतीने निवडणुकीच्या निर्णयाविरुद्ध आम्ही न्यायालयात जाणार नाही. कोणत्याही पद्धतीने लढण्यास तयार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

एकनाथ शिंदेंनी बंड पुकारण्यापूर्वी औरंगाबाद शिवसेनेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, माजी आमदार किशनचंद तनवाणी असे गट होते. बंडानंतर जैस्वाल, शिरसाट निघून गेले. तनवाणींची शक्ती मर्यादित राहिली. बदललेल्या स्थितीत खैरे-दानवे किमान एकोप्याने राहतील, एकमेकांविषयी बोलतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे होत नाही. दोन दिवसांपूर्वी खैरे यांनी दानवेंचे समर्थक शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी ईडीविरोधी आंदोलनात नाव घेतले नाही म्हणून झापले होते. त्याची परतफेड दानवेंनी टोला लगावून केली. ते म्हणाले की, आम्ही सकारात्मक राजकारण करतो आहे. आगामी निवडणुकीत अधिक जागा निवडून आणणे हेच आमचे बंडखोरांना उत्तर असेल. औरंगाबाद मध्य मतदारसंघात े उद्धव गटाला एक टक्काही फरक पडलेला नाही. सात ते २० आॅगस्टदरम्यान ‘आपला भगवा आपली शिवसेना’ मोहीम राबवली जाणार आहे. त्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मतदारांशी संपर्कावर भर दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...