आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य भाजपचे चंद्रकांत पाटील करतात. त्यावर उद्धव ठाकरेही लगेच पेटून उठतात. बाबरी पाडण्यात शिवसेनेचा कसा हात होता, हे अगदी छाती ठोकून सांगतात. नंतर चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य फिरवून सारवासारव केली आणि आपल्या म्हणण्याचा विपर्यास वगैरे झाल्याचे देखील म्हटले, पण विषय येथे संपलेला नाहीच.
राजकारणात सर्वच विधाने अनावधानाने केली जात नाहीत. कट्टर धार्मिकतेकडून चक्क धर्मनिरपेक्षतेकडे झुकणाऱ्या ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी अगदी ठरवून आणि जाणून-बुजून हे विधान करण्यात आल्याचे समजते.
पाटील काय म्हणाले?
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला की, बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता. 6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का? अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने मला तिथे ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आमच्या पाठिशी होती. मात्र, ते यात उघडपणे सहभागी नव्हते. त्यांनी समविचारी संघटनांना हे काम वाटून दिले होते. संजय संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल बोलतात. मात्र, ते त्यावेळी अयोध्येत तर होते का?, असा सवालही त्यांनी केला. बाबरी पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नसल्याचा दावाही त्यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता.
ठाकरेंचे प्रत्युत्तर काय?
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले. ते म्हणाले,मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. हा विषय गंभीर आहे. गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली, तेव्हा हे सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाच्या भरकटलेल्या भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी बाबरी प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून ही जबाबदारी झटकली होती. हे काम शिवसेनेचे असल्याचे म्हटले होते. तेव्हा बाळासाहेबांनी ही जबाबदारी स्वीकारली. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी, पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये, फोटो पण वापरू नये.
नेमकी खेळी काय?
गेली काही दिवस उद्धव ठाकरे हे धर्मनिरपेक्षतेकडे झुकणारी राजकीय भूमिका घेताना दिसत आहेत. आपला मुस्लिमांना विरोध नाही. आपले हिंदुत्व शेंडी-जाणव्याचे नाही, असे उद्धव म्हणताना दिसून येत आहेत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रवादी असल्याचे सांगत ते स्वतःला धर्मनिरपेक्ष आहे, असे दर्शवन्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकीकडे कट्टर हिंदुत्ववाद्यांसोबत धर्मनिरपेक्ष मतदारही त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. हे सारे पाहता भाजपने बाबरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याची खेळी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे आक्रमक होतील. बाबरी शिवसैनिकांनी पाडल्याचे सांगतील. अन् महाविकास आघाडीपासून मुस्लीम मतदार दुरावेल. याचा फायदा आगामी निवडणुकात भाजपमध्ये होईल, यासाठी हे वक्तव्य जाणून-बुजून चंद्रकांत पाटील यांना करायला लावले असेल, अशी शक्यताही व्यक्त होतेय.
मालेगावच्या सभेची धास्ती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देत हिंदुत्वाची भूमिका प्रभावीपणे मांडतानाच मुस्लिमबहुल मालेगावात 26 मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी मोठी सभा घेतली. सभेतील विराट जनसुमदाय पाहून मुस्लीम समुदायास पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न ठाकरेंनी सुरू केल्याचे दिसून येत होते. हा मुस्लीम मतदार ठाकरेंसोबत जोडला जाऊ नये, यासाठी तर भाजपकडून बाबरीचा मुद्दा पुढे करण्यात आला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
निवडणुकीत निर्णायक मते
मुंबई महापालिकेच्या जवळपास 70 प्रभागांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे. तर राज्यात अनेक विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांची लोकसंख्या निर्णायक आहे. मुस्लीम व ख्रिश्चन मतदार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ठरवून भाजपविरोधात मतदान करतांना दिसून येतो. तो मतदार उद्धव ठाकरेंकडे झुकला जाऊ नये, यासाठी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले असावे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
कोरोना काळाची सहानुभूती
कोरोना काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी दाखविलेल्या संवेदनेमुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली. तेव्हापासून मुस्लीम समुदायातही ठाकरेंची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा ठाकरेंना निवडणुकीत होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. मालेगावात उद्धव ठाकरेंनी सभा घेतली यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज सहभागी होता. काही मुस्लिम तरुणांनी उद्धव ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणीच रोजा सोडल्याने हा मतदार उद्धव ठाकरेंना जवळ करतोय. त्यांच्यापासून हा मतदार लांब जावा यासाठी भाजपकडून ही खेळी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कितीही फितवले तरी...
राजकीय विश्लेषक जयदेव डोळे म्हणाले की, विस्मरणात गेलेली कृती बाहेर काढायची आणि विवाद उत्पन्न करायचा. तो अंगलट आला की मला तसे म्हणायचे नव्हते, असे म्हणायचे हे गेली आठ वर्षे जोरात सुरू आहे. आता कितीही आदळ आपट केली, तरी उद्धव ठाकरेंच्या बाजूने जे लोक मतदान करणार आहेत, त्यांचा निर्णय ठरला आहे. त्यांना आता कितीही फितवले, तरी ते त्यांचे मत बदलणार नाहीत. उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला आहे, मूळच्या शिवसैनिकाचा अपमान झाला आहे, हे सर्वांना माहिती झाल्याने आता काहीही केले, कितीही लक्ष विचलित करण्याच्या गोष्टी घडल्या, तरी उद्धव ठाकरेंच्या मागचे मतदान कमी होणार नाही.
हे उशिराचे शहाणपण...
ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. याबाबत कोणतीही चर्चा किंवा वाद आता झालेला नव्हता. ज्या काळात बाबरी प्रकरण घडले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे आपले विधान केले होते, ही सर्व आमची मुले होती. याचा मला अभिमान वाटतो. अनेक पोलिस केसेस कोर्ट केसेसे तेव्हा सुरू झाल्या होत्या. यात भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची यापासून दूर राहण्याची भूमिका होती. त्यामुळे ती जबाबदारी घेण्यासाठीच संघ परिवारातील नेते आणि कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे तयार नव्हते. त्यांना ते मान्य करणे अवघड झाले होते. कोर्ट केस किंवा पोलिस केसेसचा मोठा दणका त्यांना बसला असता, म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली होती. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो ढाचा पाडला असे म्हटले होते.
तर ठाकरेंना धक्का...
अरुण खोरे पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी नसलेला वाद उकरून काढणे आणि बचावात्मक पवित्रा घेत उद्धव ठाकरेंनी काही बोलण्याची गरज नाही. 'मविआ'मध्ये असलेल्या पक्षांना निवडणुकीत किती धोका असेल हे आज सांगता येणार नाही, पण असले धार्मिक आणि भावनिक विषय पेटवत ठेवण्याचे भाजपच्या राजकारणाला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी बळी पडले, तर त्यांचा राजकारणाला यांचा धक्का बसू शकेल. देशात धार्मिक धु्व्रीकरण इतके करण्यात आले आहे की, भाजपच्या बाजूने दलित आणि मुस्लीम यांचे मोठे वर्ग हे जाण्याची शक्यता खूप कमी आहे. उत्तरप्रदेश असो की दिल्ली इथे ज्या घटना घडल्या यामुळे हा वर्ग भाजपच्या बाजूने जाणार नाही. धार्मिक धुव्रीकरणाचा फटका त्यांच्या पक्षाला नक्कीच बसेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.