आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपात 4 वॉर्डांचा एक प्रभाग होणार असल्याची चर्चा:चंद्रशेखर बावन्नकुळेंनीही केली सीएमकडे मागणी; इच्छुकांचा जीव टांगणीला

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार तीन वॉर्डांचा एक प्रभाग करून त्याचा आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. त्यातच आता राज्यात सरकार बदलल्यामुळे चार वॉर्डांचा एक प्रभाग होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली. त्यामुळे इच्छुकांचे अवसान आणखी गळून पडत आहे. आधीच तीन वॉर्डांच्या प्रभागाची हद्दीने ईच्छुक त्रस्त आहेत. त्यात चार वॉर्डांचा प्रभाग म्हणजे काय अवस्था होईल, या विचारानेच अनेकांची झोप उडाल्याचे चित्र आहे.

भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी नुकतेच नाशिक येथे चार वॉर्डांचा प्रभाग करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे इतर महापालिकांतही चर्चा रंगली आहे. बावन्नकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारने पालिकांमधील वाढवलेली सदस्य संख्याही चूकीची असल्याचे नमूद केले आहे. हा निर्णय नियमाला अनुसरून नसल्याचे म्हटले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांत खळबळ उडाली आहे. मागील अडीच वर्षापासून इच्छुक उमेदवार निवडणूकीची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत. या पार्श्‍वभूमीवरच औरंगाबाद पालिकेच्या प्रभागरचनेचा आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. त्यानुसार वाढीव वॉर्डांसह 126 वॉर्डांचे प्रत्येक प्रभागात तीन वॉर्ड याप्रमाणे 42 प्रभाग तयार करण्यात आले आहे. या प्रभागांच्या हद्दी पाहून इच्छुकांच्या पोटात गोळा उठत आहे. त्यातच आता चार प्रभागांचा एक वॉर्ड झाल्यास कंबरडेच मोडेल, अशा प्रतिक्रिया इच्छुांतून उमटत आहेत.

5 ऑगस्टला वॉर्डांचे आरक्षण होणार जाहीर

निवडणूक आयोगाने अलीकडेच औरंगाबाद पालिका निवडणूकीसाठी तीन वॉर्डांची प्रभागरचना अंतिम केली. त्यानुसार 5 ऑगस्ट रोजी आरक्षणाची सोडतही होणार आहे. त्यानंतर सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात निवडणूका होतील, असा सर्वच राजकीय मंडळींचा कयास आहे. यातच आता चार प्रभागांची चर्चा रंगल्याने इच्छुक बुचकळ्यात पडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...