आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडिया:मुंबई-छत्रपती संभाजीनगरच्या वेळापत्रकात बदल, मुंबईहून येण्यासाठी पहाटे 3 वाजता गाठा विमानतळ

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विक्रमी नोंद 30 एप्रिल रोजी नाेंदवली गेली. एका दिवसात प्रथमच 4 लाख 56 हजार प्रवाशांनी देशाच्या विविध भागांत विमानाने प्रवास केला. उन्हाळी सुट्यांचे नियोजन दोन ते तीन महिन्यांपूर्वी केले जाते. शाळा-महाविद्यालयांना सुट्या सुरू झाल्या की नागरिक पर्यटनाला प्रारंभ करतात. रेल्वेचे आरक्षण फुल्ल असल्यामुळे आणि वेळेची बचत होत असल्याने नागरिक विमान प्रवासाला पसंती देत आहेत.

तीन महिन्यांआधी विमानाचे तिकीट खरेदी केल्यास कमी दर असतो. विमान प्रवासाचे भाडे रेल्वेच्या टू अथवा थ्री एसी तिकिटापेक्षा थोडेसे जास्त असते. वेळेची बचत होत असल्याने तिकडे ओढा वाढला आहे. अलीकडे हवाई मार्ग सोयीचा बनवण्यात आला आहे. देशांतर्गत सेवा देणाऱ्या आठ ते दहा विमान कंपन्या आहेत. सर्व मार्गांवरील विमानसेवा हाऊसफुल्ल आहे.

नवीन शहरांचा समावेश

प्रवासी वाढल्याने अनेक विमान कंपन्यांनी नवीन विमानांची खरेदी केली आहे. एअर इंडियाकडे विमानांचा तुटवडा आहे. त्यांनी आता फ्रान्स येथून नवीन विमाने खरेदी केली आहेत. अनेक विमानतळांवर विमानांना उतरण्यासाठी धावपट्टी रिकामी मिळत नाही. केंद्राने उडाण योजनेत नवीन शहरांचा समावेश करून घेतलेला आहे. अनेक टू आणि थ्री टायर शहरांना विमान सेवेशी जोडलेले आहे. त्यातून प्रवाशांची मोठी वाढ झाल्याचे टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे सुनीत कोठारी यांनी सांगितले.

दोन तास आधी बोर्डिंग

एअर इंडियाने एक महिन्यासाठी मुंबई-छत्रपती संभाजीनगर विमानसेवेच्या वेळेत बदल केला आहे. आता मुंबईहून छत्रपती संभाजीनगरसाठी सकाळी 5ः05 वाजता विमान निघणार आहे. नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी बुधवारपासून (3 मे) होणार आहे. मुंबईत विमानाच्या निघण्याच्या वेळेपूर्वी किमान दोन तास आधी बोर्डिंग पास घ्यावा लागतो. 5 वाजता विमानाची वेळ असल्याने प्रवाशांना पहाटे 3 वाजता मुंबई विमानतळ गाठावे लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगरला मुंबईहून येण्यासाठी इंडिगो आणि एअर इंडियाची सकाळच्या सत्रात विमानसेवा आहे. इंडिगोने सायंकाळची विमानसेवा बंद केल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडलेली आहे. विविध संस्था-संघटना तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सायंकाळची विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

एअर इंडियाच्या विमानसेवेत बदल

मुंबईहून छत्रपती संभाजीनगरसाठी इंडिगोची सेवा सकाळी 5ः30 वाजता तर एअर इंडियाची सेवा सकाळी 7 वाजता होती. आता 3 मेपासून एअर इंडियाने आपल्या विमानसेवेच्या वेळेत बदल केला आहे. पुढील एक महिन्यासाठी म्हणजेच 2 जूनपर्यंत एअर इंडियाचे विमान मुंबईहून सकाळी 5ः05 वाजता निघेल. सकाळी 6 वाजता चिकलठाणा विमानतळावर पोहोचेल. सकाळी 6ः30 नंतर पुन्हा मुंबईकडे प्रयाण करेल. केवळ एक महिन्यासाठी एअर इंडियाच्या विमानसेवेत बदल करण्यात आला आहे.