आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलने:नामांतरावरून राजकारणाचे पडघम ; नामांतरविरोधी संघर्ष समितीचे उपोषण, मनसेची स्वाक्षरी मोहीम

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात नामांतरविरोधी संघर्ष समितीने शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टीव्ही सेंटर चौकात नामांतराच्या बाजूने स्वाक्षरी मोहीम सुरू केली. हुकूमशाही पद्धतीने या दोन शहरांच्या नामांतराचा निर्णय लादण्यात आला, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला, तर द्वेषाचे राजकारण करण्याचा खासदार जलील यांचा डाव आहे, अशी टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी केली.

भाजप सरकार मनमानी कारभार करत आहे. लोकभावनांचा विचार न करता हुकूमशाही पद्धतीने ऐतिहासिक शहरांचे नामांतर करण्याचा निर्णय लादण्यात आला आहे. याविरोधात आम्ही आंदोलन सुरू केले असून सरकारने निर्णय बदलला नाही तर लढा तीव्र होत जाईल,’ असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. जलील म्हणाले, ‘आमचे आंदोलन कोणा जाती-धर्माच्या विरोधात नाही. औरंगाबाद शहराला एक इतिहास आहे, तो बदलण्याचा प्रयत्न राजकीय स्वार्थासाठी करण्यात येत आहे. त्याला आमचा विरोध आहे.’ ऐतिहासिक शहरांचे नाव बदलण्याचे कारण काय? धर्मवाद, जातीयवाद निर्माण करून अशांतता पसरवण्याचे राजकीय कटकारस्थान होत असल्याचा आरोप विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ‘आय लव्ह औरंगाबाद’ असे फलक घेऊन उपोषणकर्ते बसलेले आहेत.

आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण होईल, कोणत्याही महापुरुषाबद्दल अपशब्द अथवा धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कोणत्याही प्रकारचे विधान किंवा मेसेजेस पोस्ट करू नका. आंदोलनाची ही सुरुवात असून ते मोडीत काढण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. ते गैरवर्तन करू शकतात, त्यामुळे संयम राखावा, असे आवाहन जलील यांनी केले.

द्वेषाचे राजकारण करण्याचा जलील यांचा डाव : खांबेकर छत्रपती संभाजीनगर | नामांतरविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करताच मनसेने टीव्ही सेंटर चौकात नामांतराच्या बाजूने स्वाक्षरी मोहीम सुरू केली. एका तासात चार हजारपेक्षा अधिक नागरिकांनी समर्थनार्थ स्वाक्षऱ्या केल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली. खासदारांच्या आंदोलनात औरंगजेबाची प्रतिमा झळकवून द्वेषाचे राजकारण करण्याचा एमआयएमचा डाव आहे. आम्हाला ते चिल्लर म्हणतात. मात्र चिल्लरचा आवाज नोटांपेक्षा अधिक होतो. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना ते दिसेलच. ज्यांनी महाराजांना त्रास दिला त्या बादशहाचे नाव आता शहराला पुन्हा देऊ देणार नाही. खासदारांना पुळका असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांचे नाव औरंगजेब ठेवावे, असे उत्तर जिल्हाध्यक्ष खांबेकर यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...