आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावी इयत्तेच्या परीक्षांचे निकाल तोंडावर असताना उत्तरपत्रिकांतील हस्ताक्षर बदल आणि कथित गैरप्रकारांवर बोर्डाच्या येथील कार्यालयात मंगळवारी सुनावणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी ८७ प्रकरणांत चौकशी समितीने विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले. यात विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांत अगदी मोजक्या प्रश्नांची जी उत्तरे लिहिली गेली आहेत ती इतर कुणीतरी नंतर लिहिली असल्याचा दावा केला.
हस्ताक्षर बदल असलेली ही प्रश्नांची उत्तरे एका ओळीत तर काही उत्तरपत्रिकांत फार तर तीन ओळी लिहिली गेली आहेत. या प्रकारामुळे आता निकाल राखून ठेवला जाणार का, किंवा आपण लिहिलेल्या बरोबर उत्तरांच्या गुणांवर परिणाम होणार का, या विचाराने विद्यार्थी व पालक प्रचंड धास्तावले आहेत. विशेषत: फिजिक्सच्या उत्तरपत्रिकांत हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाला आहे. शिवाय, पहिल्या दिवशी ५५हून अधिक विद्यार्थी एकट्या अंबाजोगाई व परिसरातील होती. या चौकशीनंतर “या पान क्रमांकावर माझे हस्ताक्षर नाही’ असे विद्यार्थ्यांकडून पालकांच्या साक्षीने लिहून घेण्यात आले. विद्यार्थ्यांनुसार, काही उत्तरपत्रिकांत एका ओळीत हस्ताक्षर बदल होता तर काहींत तीन ओळीत. विद्यार्थ्यांनी लेखीमध्ये हा प्रकार स्पष्ट नाकारल्याने एवढ्या उत्तरपत्रिकांत रिकाम्या जागी उत्तरे लिहिली कुणी, हा प्रश्न चौकशी समितीसमोर कायम आहे. यादरम्यान २००-२५० किमी अंतरावरून आलेल्या विद्यार्थी-पालकांचे उन्हात हाल झाले. एकूण ५५२ उत्तरपत्रिकांबाबत ही सुनावणी होत असून ती ७ दिवस चालेल. याशिवाय दहावीच्या ७५ विद्यार्थ्यांनाही बोलावण्यात आले आहे.
बोर्ड शहानिशा करेल
पेपर तपासताना शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना बोर्डाने चौकशी साठी बोलावले आहे. विद्यार्थी स्पष्ट नाकारताहेत त्यामुळे हा बदल कुणी केला असा प्रश्न विद्यार्थी आणि बोर्डालाही पडलाय. या मुलांचे आता निकाल उशिराने लागण्याची शक्यता आहे. बोर्डाने या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली जाईल, असे म्हटले आहे. - अनिल साबळे, अध्यक्ष बोर्ड
चौकशी पथकालाच संबंधित भागात पाठवा :
आमच्या मुलांनी चूकच केलेली नाही. कुणीतरी तिसऱ्यानेच हा प्रकार केला आहे. एवढ्या दूर बोलावून आमची ससेहोलपट कशाला केली? बोर्डाने चौकशी समितीचे मोजके सदस्य संबंधित भागात पाठवून सुनावणी घ्यावी. म्हणजे विद्यार्थी-पालकांचीही सोय होईल, असे अंबाजोगाईचे सचिन केंद्रे म्हणाले.
अनेक विद्यार्थी पहाटेच बसने दाखल झाले. त्यांना इथे कोणतीच सोय नसल्याने बसस्टँडवरच थांबावे लागले. यात खर्चाचा भार पडलाच शिवाय बोर्डाच्या कारणे दाखवा नोटीसमध्ये विद्यार्थ्यांवर केलेले “गैरमार्ग केल्याचे प्रथम दर्शनी दिसल्याने’ अशा शब्दांत थेट आरोप चुकीचे आहे असे अंबाजोगाईचे दत्ता मुळे म्हणाले.
उत्तरपत्रिका जमा, तपासणीला पाठवण्याची पद्धत :
- परीक्षेदिवशी उत्तरपत्रिका जमा करून केंद्र संचालक विद्यार्थी व उत्तरपत्रिकांची संख्या याची पडताळणी करतात.
- २५ उत्तरपत्रिकांचा एक याप्रमाणे हे गठ्ठे कस्टोडियन सेंटरवर आणले जातात.
- या उत्तरपत्रिकांवर बारकोड असल्याने त्या नेमक्या कुणाच्या आहेत हे कळत नाही. अशा उत्तरपत्रिका ज्या महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवायच्या आहेत त्या प्राचार्यांच्या नावे गठ्ठे पाठवतात.
लवकरच चौकशी अहवाल
मॉडरेटर रवींद्र पाटील यांच्यानुसार, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देता हस्ताक्षर बदलाचे गुण वगळून इतर बरोबर उत्तरांचे गुण देऊन निकाल दिला जाईल. चौकशीचा अहवाल राज्य मंडळासमोर मांडला जाईल.
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्यानुसार, ज्या उत्तरात हस्ताक्षर बदल दिसत आहे तेवढे गुण वगळून विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराशी जुळणाऱ्या उत्तरांना पूर्ण गुण देऊन निकाल दिला जाऊ शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.