आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेगमपुरा ठाण्यात तक्रार दाखल:तिरुपती बालाजीच्या सेवेच्या नावाखाली लाखो उकळून 384 जणांची फसवणूक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुपती बालाजीच्या मंदिरात ८ दिवस सेवा करण्याच्या नावाखाली प्रतिव्यक्ती साडेतीन हजार रुपये उकळून तब्बल ३८४ जणांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी दुपारी नगरसेविका कीर्ती शिंदे व फसवणूक झालेल्या नागरिकांनी संशयितास पकडून बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. ज्ञानेश्वर भगवानराव निकम (५२, रा. पैठण) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. फसवणूक झालेल्या लोकांच्या वतीने वैशाली येरजाळे यांनी तक्रार अर्ज दिला आहे.

यात शिंदे यांचीही फसवणूक झाली. त्यांनीही निकमवर विश्वास ठेवून पैसे भरले होते. त्यांना २५ जानेवारी ही सेवेची तारीख दिली होती. मात्र काही कारण सांगून ही तारीख आता १ फेब्रुवारी आणि त्यानंतर ३ फेब्रुवारी झाल्याचे सांगितले. त्यानंतर शिंदे यांना संशय आला. अहमदननगर,जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक महिला व पुरुषांकडून त्याने प्रत्येकी साडेतीन हजार रूपये आकारले होते. त्यात रेल्वेने जाणे व कोल्हापूरमार्गे परत येण्याचे रेल्वे भाडे होते.

निकम याने जालना येथील श्याम विनायक जोशी यांच्या संपर्कातील २२५ व बेगमपुरा भागातील वैशाली येरजाळे यांच्या संपर्कातील १५९ लोकांकडून रक्कम घेतली. त्यानंतर तिरुपती संस्थानने काही जाचक अटी घातल्यामुळे सेवा पुढे ढकलण्यात आली आहे असे सांगत निकम चालढकलपणा करत होता. त्यामुळे नागरिकांनी शिंदे यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनी फसवणूक करणाऱ्या निकमला घेऊन ठाण्यात गेले. याप्रकरणी नागरिकांनी तक्रारी दिल्या असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मंदिरात बैठका घेऊन देत होता माहिती निकमने मागील महिन्यात बेगमपुरा भागात एका मंदिरात बैठक घेऊन सर्व नियोजन सांगितले होते. या बैठकीला दोनशे ते तीनशे नागरिक उपस्थित होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्याने अनेकांना गंडवले आहे.

बातम्या आणखी आहेत...