आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडिया इन्फोलाइन फायनान्स कंपनीकडे गहाण असलेल्या प्लॉटवरील कर्जफेड करण्यासाठी प्लॉट खरेदीदार संस्था स्काय हाइट्स प्रॉपर्टीज यांच्याकडून उसने घेतलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी प्लॉट विक्रेता शैलेश कासलीवाल याने दिलेले ३ धनादेश वटलेच नाहीत. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांनी त्याला ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच स्काय हाइट्स या संस्थेस १ कोटी ४८ लाख ५७,००८ रुपये तीन महिन्यांत अदा करावेत, तसे न केल्यास आणखी सहा महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही कासलीवाल यांना बजावले.
कासलीवाल यांनी सातारा गाव येथील प्लॉट क्रमांक २ स्काय हाइट्स प्रॉपर्टीज कंपनीला विकला होता. मात्र हा प्लॉट कासलीवाल यांनी इंडिया इन्फोलाइन फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवलेला होता. तो ३ महिन्यांत बेबाकी करून देण्याची जबाबदारी कासलीवाल यांची होती. परंतु, या रकमेपेक्षा जास्त पैसे त्यांनी स्काय हाइट्सकडून घेतले होते. या अतिरिक्त पैशाच्या मोबदल्यात कासलीवाल यांनी स्काय हाइट्सला ३ वेगवेगळे धनादेश दिले. पण ते वटले नाहीत. त्यामुळे स्काय हाइट्सने अॅड. सचिन सारडा यांच्यामार्फत कोर्टात दावा ठोकला.
कासलीवाल यांनी बचावात सांगितले की, हे धनादेश केवळ सुरक्षेपोटी दिलेले आहेत, व्यवहाराशी त्याचा कोणताही संबंध नाही. आमच्या प्लॉटचा सौदा २ कोटी ९० लाखांचा आहे. पण आयकर भरावा लागू नये म्हणून कंपनीने कमी रकमेचे खरेदीखत केले. त्यामुळे आम्ही स्काय हाइट्सचे कोणतेही देणे लागत नाही.
पण अॅड. सारडा यांनी न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून दिले आहे की, धनादेशावरील स्वाक्षरी व अक्षर याच्याबद्दल कुठलाही वाद आरोपीने उपस्थित केलेला नाही. खरेदीखताबाबत कोणताही वाद नसताना त्यातील नोंदी चुकीच्या आहेत, असे कासलीवाल सांगू शकत नाही. फायनान्स कंपनीकडे स्काय हाइट्सने कासलीवालच्या बेबाकीसाठी सौदा रकमेपेक्षा अतिरिक्त एक कोटी चार लाख रुपये रक्कम भरले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.