आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शेंद्रा येथील वाल्मीकराव दळवी कॉलेजवरील परीक्षा केंद्राच्या चौकशीसाठी वरिष्ठ प्राध्यापकांची तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. ‘दिव्य मराठी’च्या दणक्यामुळे समितीला 24 तासातच अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवालानंतर केंद्रावर तर कारवाई केली जाईल. त्याशिवाय फेरपरीक्षेचा पर्यायही अवलंबणार असल्याचे कुलगुरू येवले यांनी म्हटले आहे.
प्रकरण नक्की काय?
शहरापासून 18 किमी दूर शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र चक्क शेजारचे ए. के. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ‘ऑपरेट’ केले जाते आहे. या सेंटरवर सकाळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळी 4 ते 6 च्या वेळेत पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यास दिल्या जातात. हे दुकानदार फक्त 300 ते 500 रुपये घेऊन संस्थाचालकाच्या मदतीने ही विशेष ‘सोय’ उपलब्ध करून देतात.
कारवाईसाठी कडक पाऊल
‘पाचशे रूपयात पेपर सेटिंग’ या मथळ्याचे वृत्त झळकताच सर्व प्रादेशिक मराठी वृत्तवाहिन्यांनी सुटीच्या दिवशी परीक्षा केंद्रावरून लाईव्ह रिपोर्ट केला. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ च्या वृत्तामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. कुलगुरूंनी या केंद्रावर तातडीने कारवाईसाठी कडक पावले उचलले आहेत.
अहवाल सादर करण्याचे आदेश
या केंंद्रावर विद्यापीठाचा एक केंद्रपमुख आधीच होता. त्यात आणखी एकाची भर घातली जाणार आहे. विद्यापीठाने हे परीक्षा केंद्र ताब्यात घेतले आहे. आता उर्वरित पेपर विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या देखरेखीत घेतले जातील. परीक्षा केंद्रावर सुरू असलेला गैरप्रकाराची तीन सदस्यीय प्राध्यापकांच्या समितीद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. या समितीला २४ तासांतच अहवाल सादर करण्याचे आदेशही कुलगुरूंनी दिले आहे.
परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी महावीर जयंतीची सुटी असताना मंगळवारी परीक्षा भवनात येऊन बसल्या. तातडीने तीन परिपत्रके काढण्याच्या सूचना कुलगुरूंनी त्यांना दिल्या आहेत.
प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस
संवेदनशील परीक्षा केंद्रावर भरारी पथकांच्या ऐवजी तिथे बैठे पथके दिले जाणार आहेत. त्याशिवाय सहकेंद्रप्रमुखांचे कामही मॉनिटर केले जाईल. भरारी पथकांसाठी ज्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. त्यांना प्राचार्यांनी कार्यमुक्त करणे गरजेचे आहे. पण प्राध्यापकांना कॉलेजमधून न सोडणाऱ्या प्राचार्यांना नोटीस दिली जाईल.
परीक्षेच्या कामात अजिबात बेपर्वाही सहन केली जाणार नाही. दळवी कॉलेज दोषी आढळले तर त्यांची संलग्नता रद्द करण्याचाही आम्ही विचार करू असे कुलगुरूंनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले आहे.
पाचशे रुपयांत पेपर सेटिंग!:B.sc ची परीक्षा सकाळी, मात्र सायंकाळी उत्तरपत्रिका लिहिण्याची काही विद्यार्थ्यांसाठी ‘खास सोय’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेतील आणखी एक धक्कादायक गैरप्रकार ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणला आहे. शहरापासून १८ किमी दूर शेंद्रा गावात वाल्मीकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र चक्क शेजारचे ए. के. फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदारांकडून ‘ऑपरेट’ केले जाते आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.