आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगरसाठी मनसे मैदानात:विभागीय आयुक्तालयावर 16 मार्चला स्वप्नपूर्ती रॅली; समर्थनाची 5000 पत्रे प्रशासनाला देणार

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या नामकरणास विरोध करत एमआयएमने आंदोलन छेडले आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून आता छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे. त्यासाठी 16 मार्च रोजी विभागीय आयुक्तालयावर स्वप्नपूर्ती रॅली काढण्यात येणार आहे. या माध्यमातून नामकरणाच्या समर्थनार्थ 5000 पत्रे देण्यात येतील, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या आनंदामध्ये काही लोक विरजण कालवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी कुठलेही कारण नसताना छत्रपती संभाजीनगर नावास विरोध केल्याचा आरोपही खांबेकर यांनी केला.

खांबेकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या अगोदरच पत्रकार परिषद घेऊन नामांतरावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानुसार ज्या प्रमाणे विरोध होईल, त्याच प्रमाणे उत्तर देण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांचे अनेक दशकापासूनचे स्वप्न पूर्ण झाले असून, त्या सर्व लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वप्नपूर्ती रॅली आयोजित केली आहे. सर्व नागरिक समर्थनाची पत्र घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहेत.

खांडेकर म्हणाले की, ही रॅली प्रचंड मोठी होणार असून या द्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हजारो समर्थन पत्रके सरकार दरबारी पोहचवणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लाखो लोकांनी आपली समर्थन पत्रे त्वरित जमा करावीत, असे आवाहन मनसे तर्फे करण्यात आले. ही रॅली 16 मार्च 2023 गुरुवार रोजी सकाळी 11:30 वाजता संस्थान गणपती येथून सुरू होणार असून, हजारो पत्रके आणि समर्थन पत्रे विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहेत.

पत्रकार परिषदेस पक्षाचे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, अशोक तावरे, सतनामसिंग गुलाटी, जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर, दिलीप बनकर पाटील, वैभव मिटकर, बिपीन नाईक, अनिकेत निल्ल्लावार, प्रशांत जोशी,संकेत शेटे,नागेश तुसे,अशोक पवार, राहुल पाटील, विक्रम सिंग परदेसी, मनीष जोगदंड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...