आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण बंद:छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे कोरोना लस नाही; हजारो लसी एक्सपायर

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील देशभराप्रमाणे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. याचा धोका जिल्ह्याला देखील असून प्रतिबंधक उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे लसीकरणावर भर देण्याचा आव आरोग्य विभाग आणत असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिक आणि आरोग्य विभागही लसीकरणाच्या बाबतीत अनुत्सुक असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेकडे असलेल्या हजारो लसी एक्सपायर झाल्या असून नवीन लसी आरोग्य विभागाला अद्याप पर्यंत प्राप्त झालेल्या नाही. यामुळे आजघडीला आरोग्य विभागाकडे लसीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

पुन्हा आलेल्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे लसीकरण आणि कोरोना चाचणीवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र वरिष्ठांना दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी ग्रामीण भागात होत नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये नागरिक देखील सहकार्य करत नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या जिल्हा परिषद कडे कोवॅक्सीन, कोविशील्ड आणि कार्बोवक्स अश्या कोणत्याच लसी उपलब्ध नाही.

आरोग्य विभागाकडे पडून असलेल्या हजारो लसीची मुदत 31 मार्च 2023 लाच संपली आहे. तेव्हापासून जिल्हाभरात लसीकरण खोळंबले आहे. आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लस न घेताच परतावे लागत आहे. आरोग्य विभागाकडून नवीन लसीची मागणीच अजून करण्यात आलेली नाही. त्यामुळे अजून किती दिवस लसीसाठी वाट बघावी लागणार आहे. याचा अंदाज येत नसल्याचे खुद्द आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

लसीसाठी पाठपुरावा करतोय

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके म्हणाले की, ​​​​​​ जि.प.कडे असलेल्या लसीची मुदत संपली आहे. मागील पाच दिवसापासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प आहे. राज्याकडे लसीची मागणी करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना आणि एच 3 एन 2 च्या पार्श्वभूमीवर आम्ही लस मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहे. नागरिकांनी देखील स्वतःला सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.