आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरमध्ये अकरावीचे प्रवेश ऑफलाइन होणार आहेत. मात्र, इतर ठिकाणी हे प्रवेश ऑनलाइन होतील. त्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अडचणी, प्रवेश ऑनलाइन की ऑफलाइन यामुळे पालकांमध्येही मोठा संभ्रम होता. तो यंदा लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जूनमध्ये नोंदणी
दहावी-बारावीच्या राज्य मंडळाने घेतलेल्या परीक्षांच्या निकालाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील मुंबईसह पुणे, पिंपरी - चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिकांच्या हद्दीतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, छत्रपती संभाजीनगर वगळता १ जूनपासून संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण
ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाकडून १५ मे पासून विद्यार्थ्यांसाठी मदत कक्ष सुरू केला जाणार आहे. त्यानंतर डेमो नोंदणीसाठी २२ मे पासून सुरुवात केली जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना २९ मे पर्यंत अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात १ जून पासून संकेतस्थळावर नोंदणीची आणि अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात केली जाणार आहे.
स्पष्ट सूचना नाही
दहावीचा निकाल लागल्यानंतर महाविद्यालयांचा पसंती क्रमांक आणि अर्जाचा भाग दोन भरण्यास सुरुवात होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या वर्षी ऑफलाइन पद्धतीने प्रवेश झाले होते. ते यंदा देखील कायम राहण्याची शक्यता आहे. परंतु त्याबाबत अजून स्पष्ट सूचना नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा
२०२० पर्यंत ऑनलाइन पद्धतीनेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र, संस्थाचालकांची मागणी आणि छत्रपती संभाजीनगरमधील प्रवेश क्षमता लक्षात घेता. गेल्या वर्षीपासून ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते आहे. ऑफलाइन असल्याने विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.