आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, प्रकल्प १ व २, फुलंब्री १, गंगापूर १,२, कन्नड १,२, खुलताबाद १, पैठण १,२, सिल्लोड १,२, सोयगाव १, वैजापूर १ अशा एकूण १४ एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या ३ हजार ४०४ अंगणवाड्यांपैकी तब्बल ८९९ अंगणवाड्यांना स्वतःची इमारतच नाही.
यापैकी ३६९ अंगणवाडीमधील चिमुकले भाड्याच्या खोलीत, तर ४२० अंगणवाडीमधील चिमुकले जिल्हा परिषद शाळेच्या एखाद्या पडक्या पत्राच्या खोलीत, समाज मंदिर, ग्रामपंचायतीच्या एखाद्या जुन्या खोलीत चिमुकल्यांना नाइलाजाने ज्ञानार्जन करावे लागते. तर २ हजार ७५ अंगणवाड्यांना नळजोडणी अन् ३ हजार २८६ अंगणवाड्यांना वीज जोडणीदेखील झालेली नाही.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील ९६१ अंगणवाड्यांमध्ये शौचालयच नसल्याचा धक्कादायक समोर आला आहे. जिल्ह्यातील ३४०४ अंगणवाड्यांपैकी २८०३ मोठ्या, तर ७९९ छोट्या अंगणवाड्या आहेत. परंतु, तब्बल ८९९ अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नसल्याने चिमुकल्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करावे लागते. जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाड्या भरत असल्याचा दावा महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यधिकारी व प्रकल्प अधिकारी करत असतील, परंतु, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत अंगणवाड्या भरवल्याचे कागदोपत्री सांगितले जाते. परंतु शाळेच्या इमारतीत न भरता आवारात उघड्यावरच भरतात.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी उघड्यावरच बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आहार घ्यावा लागतो. अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून साडेसहा लाखांचा निधी मिळतो. मात्र, अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तसेच जागा उपलब्ध नसल्याने अनेक अंगणवाड्या उघड्यावर भरतात.
एकीकडे शासन ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांसाठी विविध उपक्रम राबवत असताना पूर्व शालेय शिक्षणावर भर देत आहे. परंतु, पूर्व शालेय शिक्षण देण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नाही. अंगणवाडी सेविकांना अडचणी येतात. शासनाने यावर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे शिऊरच्या अंगणवाडी सेविका शालिनीताई पगारे यांनी सांगितले.
किती इमारतींना मान्यता ?
माझ्या माहितीप्रमाणे ६२० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. मागील आर्थिक वर्षात ७८ अंगणवाड्यांच्या इमारतीला प्रशासकीय मान्यता दिली. जागा उपलब्ध असतानाही उदासीनता का? जागा उपलब्ध असते त्या ठिकाणी इमारतीसाठी निधीच्या मागणीचा अाम्ही प्रस्ताव देतो. जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी भाड्याच्या इमारतीत, शाळेच्या इमारतीत, समाज मंदिरात अंगणवाड्या भरताहेत.
सध्या किती प्रस्ताव आलेत?
नवीन इमारतीसाठी दरवर्षी प्रस्ताव मागवण्यात येतात. ७५ प्रस्ताव आले आहेत. त्यांची लवकरच प्रोसेस करणार आहोत.
निधीचा अभाव
निधीच मिळत नसल्याने इमारतींचा प्रश्न अंगणवाड्यांच्या इमारतींबाबत जि.प. मासिक बैठकीत मी वारंवार चर्चा घडवून आणली. जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या इमारतीच्या बांधकामासाठी मूलभूत निधी मिळत नसल्याने हा विषय मागे पडला आहे. त्यामुळे चिमुकल्यांना ऊन, थंडी, वारा, पावसाळा त्रास सहन करावा लागतो.
-किशोर नारायणराव पवार, माजी जि. प. सदस्य.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.