आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरातील सुतगिरणी चौकात एक बस जळून खाक तर दुसरी अर्धी जळाली आहे. सुतगिरणी चौकात देशी दारुच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या बसमध्ये अचानक आग लागल्याची घटना बुधवारी 8 ते 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. आगीच्या घटनेचा थरार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
नेमके काय घडले?
छत्रपती संभाजीनगरमधील सुतगिरणी चौक परिसरात एका देशी दारुच्या दुकानासमोर काही बस रोज रात्री उभ्या करण्यात येतात. बुधवार(आज) रात्री 8 ते 9 च्या सुमारास उभ्या असलेल्या एका बसला आग लागली. यात आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या बसनेही पेट घेतला. यात कुणी जखमी झाल्याची माहिती पुढे आली नाही.
काल शिवशाहीला आग
नागपूर- अमरावती महामार्गावर नागपूरहून अमरावती जाणाऱ्या शिवशाही बसला मंगळवारी आग लागली. बस कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ आली असताना अचानक गाडीतून धूर येत गाडीने पेट घेतला.
नागपूर ते अमरावती जाणारी शिवशाही बस (एमएच- 06, बीडब्लू- 0788) सकाळीच नागपूरहून निघाली होती. गाडी कोंढाळी जवळील साई मंदिराजवळ आली असताना इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक अब्दुल जहीर शेख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बस लगेच रस्त्याच्या कडेला लावली, यावेळी वाहक (कंडक्टर) उज्वल देशपांडे यांनी गाडीतील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. यावेळी गाडीत असलेले 16 ही प्रवासी वेळीच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान प्रवासी गाडी खाली उतरताच आगीने उग्र रूप धारण केल्याने यात जळून संपूर्ण बस भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला, त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तो पर्यंत बस संपूर्णपणे जळून खाक झाली होती. यानंतर एसटी महामंडळाच्या दुसऱ्या बसने प्रवाश्यांना पुढे पाठविण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.