आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा फुटबॉल लीग:शहानूर स्पोर्टिंगचा एमएफएवर दणदणीत विजय, यंग बाईजही जिंकला

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छावणीतील गांधी मैदानावर सुरू असलेल्या जिल्हा फुटबॉल लीग स्पर्धेत सकाळच्या सत्रात झालेल्या लढतीत शहानूर स्पोर्टिंगने एमएफए संघावर मात केली. तर यंग बॉईज (अ) संघाने आरएफसी संघावर शानदार विजय मिळवला. इतर एक सामना बरोबरीत सुटला. छत्रपती संभाजीनगर फुटबॉल संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

छावणी परिषदेतील गांधी मैदानावर पहिला सामना आझाद युनायटेड विरुद्ध गोगानाथ एफ. सी. यांच्यात झाला. या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 गोलने बरोबरी साधली. गोगानाथ एफ. सी. संघातील राज आणि साजन यांनी प्रत्येकी एक एक गोल केला. आझाद युनायटेडच्या फैजानने जबरदस्त कामगिरी करत दोन गोल केले. गोगानाथ एफ. सी. संघाच्या राजला सामनावीर घोषित करण्यात आले. दुसरा सामना शहानूर स्पोर्टिंग विरुद्ध एमएफए असा झाला. हा सामना शहानूर स्पोर्टिंगने 3-0 असा गोल फरकाने एकतर्फी जिंकला. या सामन्यात विजयी संघातील आमीर, सज्जू आणि कैसर यांनी प्रत्येकी एक एक गोल केला. कैसरला सामनावीर घोषित करण्यात आले.

तन्मय, शाहबाज, अबरार चमकले

तिसऱ्या सामन्यात यंग बॉईज (ए) विरुद्ध आरएफसी यांच्यात जोरदार लढत झाली. यात यंग बॉईज (अ) संघाने 3-2 अशा गोल फरकाने विजय मिळवला. यंग बॉईज संघातील शाहबाज याने एक आणि तन्मयने दोन मैदानी गोल केले. आरएफसी संघातील अबरार आणि अब्बास यांनी प्रत्येकी एक गोल केला. आरएफसी संघातील खेळाडू बासित याला मान्यवरांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. इतर एका सामन्यात ग्रीन लायन विरुद्ध औरंगाबाद डेक्कन ऑरेंज असा होता. मात्र, डेक्कन ऑरेंज हा संघ अनुपस्थित राहिल्यामुळे ग्रीन लायन संघाला विजयी घोषित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...