आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळा प्रकरण:मला ईडीची नोटीस नाही, मुंबईत दुसऱ्या कामासाठी आलो; जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल प्रकरणात ईडीने यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोटीस देवून चौकशी झाली होती. याबाबत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना देखील ईडीची नोटीस आल्याची चर्चा होती. मात्र, अशा प्रकारची कुठलीही नोटीस मला आली नसल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

पांडेय म्हणाले की, मी नवीन मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या भेटीसाठी मुंबईत आलो आहे. त्यामुळे मला अद्याप अशी कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचे त्यांनी सागितले. घरकुल घोटाळा प्रकरणामुळे महापालिका स्तरावर मोठ्या प्रमाणात बदनामी देखील झाली आहे. तसेच केंद्रीय पातळीवर देखील या प्रकरणात जागेपासून कुठलेच काम न झाल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी देखील नाराजी वर्तवली आहे.

देशात इतर ठिकाणी घरकुल बाबतची कामे वेगाने होत असताना छत्रपती संभाजी नगर मात्र याबाबतीत पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी माध्यमातून देखील चौकशी करण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

महापालिकेने पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेंतर्गत सुमारे 39 हजार घरांचा ‘डीपीआर’ तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. फेब्रुवारी 2022 मध्ये टेंडर निघाल्यानंतर समरथ मल्टिबीज इंडिया प्रा. लि., इंडग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व जग्वार ग्लाेबल सर्व्हिसेस या कंपन्यांनी एकाच ‘आयपी अॅड्रेस’वरून टेंडर भरले. यातून कोट्यवधींचा घोटाळा करण्याच्या ते तयारीत होते. या प्रक्रियेत कागदपत्रे सादर करताना पुण्याच्या न्याती कंपनीचे नाव जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीशी जोडण्यात आले. त्यामुळे मूळ न्याती कंपनीचे संचालक नितीन द्वारकादास न्याती, पीयूष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती यांना अनुक्रमे 16, 17 आणि 18 क्रमांकाचे आरोपी करण्यात आले.

असे गोवले कंपनीचे नाव

टेंडरसाठी अर्ज करताना नहार बंधू व गुंजाळ याने जाणीवपूर्वक नामांकित कंपनी निवडली. न्याती कंपनीसोबत 2 मार्च तारखेचे 22 पानांचे नोटरी केलेले ‘जॉइंट व्हेंचर अॅग्रीमेंट’ बनविले. कंपनीच्या संचालकांच्या बनावट सह्या केल्या. मुळात 2 मार्च 2022 रोजी कंपनीचे संचालक दुबई येथे असताना शहरात त्यांच्या नावाने उपस्थित असल्याचे भासवून ‘बीफोर मी’ करत करार नोटराइज करण्यात आले.

न्याती कंपनीने माहितीच्या आधारात ही सगळी कागदपत्रे मिळवून खासगी हस्ताक्षर तपासणी कंपनीकडून पडताळून घेतली असता सर्व सह्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कंपनीचे अधिकृत अधिकारी श्रीनिवास अय्यर यांनी आधी पाेलिसांकडे तक्रार केली. नंतर न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी सहायक निरीक्षक सुनील कराळे अधिक तपास करत आहेत.