आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीची मागणी:किराडपुरा दंगल एमआयएम, भाजपनेच घडवली, दंगलीनंतर 34 दिवसांनी काँग्रेसचा थेट आरोप

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएम आणि भाजप यांनी राजकीय स्वार्थासाठीच किराडपुरा दंगल घडवली, असा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी बुधवारी (3 मे) पत्रकार परिषदेत केला. दंगलीनंतर 34 दिवसांनी काँग्रेसने हा आरोप केला आहे.

‘आम्ही राज्यपालांची भेट घेतली असून या दंगलीची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. अजूनही या दंगलीचा अहवाल अद्याप आलेला नाही हे राज्य सरकारचे अपयश आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

नसीम खान यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षांवर टीका केली. ते म्हणाले की, ‘दंगल होऊन ३४ दिवस झाले आहेत, मात्र अजूनही या दंगलीबाबतचा अहवाल पोलिसांनी सादर केलेला नाही. दंगलीच्या आधी महिनाभर शहरात सभा घेऊन तणाव निर्माण करण्यात आला. ​​​​​​

सभांमध्ये प्रक्षोभक भाषणे देण्यात आली. मात्र अशी भाषणे करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी याबाबत हलगर्जीपणा दाखवला. त्यावेळेसच कारवाई झाली असती तर पुढचा प्रकार टाळला असता. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींद्वारे दंगलीची चौकशी झाली तर या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात यावी.’ पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष युसूफ शेख, इब्राहिम पठाण, सय्यद अक्रम उपस्थित होते.