आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्सीखेच:छत्रपती संभाजीनगर लोकसभा भाजप नव्हे, शिंदेसेनाच लढणार; दावे करणे सुरू

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरगेल्या सात-आठ महिन्यांपासून भाजपने २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना ते संभाव्य उमेदवार असतील, असेही सांगण्यात आले. त्यानुसार ते मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगर लोकसभा २०२४ मध्ये भाजप नव्हे तर शिंदेसेनाच लढणार असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी (५ मे) स्पष्ट केले. त्यामुळे भाजप-शिंदेसेनेत वाद होण्याची शक्यता आहे. क्रांती चौकात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणातील आंदोलकांशी भुमरे यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, की ही जागा शिंदेसेनेच्याच वाट्याची आहे. त्यामुळे आम्हीच ती लढवणार आहोत. हा आमचाच अधिकार आहे. वाटल्यास भाजपला आम्ही दुसरी एखादी जागा देऊ.

९ पैकी सात वेळा यश
१९८५मध्ये शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरात आगमन झाल्यापासून ९ लोकसभा शिवसेनेने लढवल्या. त्यात सात वेळा त्यांना यश िमळाले. १९९६मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण बाबा पाटील आणि २०१९मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले. चंद्रकांत खैरे सलग चार वेळा खासदार झाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला. येथे भाजपची भूमिका धाकट्या भावाची राहिली. पण शिवसेनेत फूट पडताच भाजपच्या इच्छुकांचे डोळे चमकू लागले. त्यांनी वरिष्ठांकडे या जागेसाठी आग्रह धरला. विधानसभा क्षेत्रनिहाय मतांची गणिते लक्षात घेता शिंदेसेना, रिपाइं आठवले गटाच्या मदतीने भाजपला यश मिळू शकते, असे सांगण्यात आले. ते खरे मानून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यांनी एक बैठकही घेतली. त्यात डाॅ. कराड यांना जिल्हाभर जनसंपर्क वाढवण्याची सूचना करण्यात आली. त्या आधारावर डाॅ. कराड यांनी गेल्या आठ महिन्यांत किमान ४० पक्षबांधणी मेळावे, केंद्राच्या योजना सांगणारे कार्यक्रम घेतले आहेत. त्या कार्यक्रमांचा रोख प्रचारावरच होता.

अजून संघटना बांधणी नाही
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जागा लढवण्याचा दावा केला असला तरी शिंदेसेनेकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांत अद्याप संघटना बांधणी झालेली नाही.

बूथप्रमुख नियुक्तीसह मेळावे
९०० पेक्षा अधिक बूथप्रमुख नियुक्त. तालुकानिहाय मेळाव्यांचे आयोजन. केंद्रीय योजनांच्या प्रचारावर भर. मुस्लिम मतदारांना आकृष्ट करण्याच्या योजनेत छत्रपती संभाजीनगरचा समावेश.