आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामांतराचा मुद्दा पुन्हा तापला:मनपा कामकाजात छत्रपती संभाजीनगर, फलकांवरील नावे बदलण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील ३५ वर्षांपासून शहराच्या नामांतरावरून राजकारण सुरू आहे. आता नामांतराच्या बाजूने आणि विरोधात असलेले दोन्ही गट रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी विभागप्रमुख, शाखाप्रमुखांना यापुढे कामकाजात छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करावा, मालमत्तांवरील फलकांवरही बदल करावा, असे आदेश शुक्रवारी काढले आहेत.

आैरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारने २४ फेब्रुवारीला मंजुरी दिली. त्यानंतर लगेच राज्य शासनाने नवीन नाव राजपत्रात प्रसिद्ध केले. . यापुढे औरंगाबाद शहर, तालुका व जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात येत असल्याचे राजपत्रात नमूद केले आहे. मनपानेही नामांतराचा ठराव घेतल्यानंतर मुख्यालयातील फलकांसह सर्व वॉर्ड कार्यालये, मालमत्तांवरील फलक, उद्याने, व्यापारी संकुलावर नवीन फलक लावले जाणार आहेत.

एमआयएमचा आक्रमक पवित्रा : या मुद्द्यावर एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी रस्त्यावर लढा देण्याची तयारी दाखवली आहे. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करतो. मात्र, आैरंगाबाद शहराचे नाव बदलू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

पोलिस सतर्क : या सगळ्या परिस्थितीवर पोलिसांची विशेष शाखा, आयबी, एसआयटीचे विशेष लक्ष आहे. शनिवारी होणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल. शहरातदेखील साध्या वेशात पोलिसांची गस्त राहील. पोलिसांच्या विशेष शाखेने काही पुढाऱ्यांशी खासगीत बोलणी करून शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.

नामांतराला आमचा विरोध राजकीय पक्षाच्या इच्छेपोटी हाेत असलेले ऐतिहासिक शहराचे नामांतर आम्हाला मान्य नाही. शहराचे नाव बदलू देणार नाही. नामांतराला विरोध ही शहरातील जनभावना आहे. म्हणून लोकशाही मार्गाने विराेध करणाऱ्यांना आमच्या पक्षातर्फे समर्थन देत आहोत. - इम्तियाज जलील, खासदार

खासदार वातावरण बिघडवतात खासदार शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. त्यांना लढा द्यायचा असेल तर कायदेशीर मार्गाने द्यावा. त्यांना पुढच्या वेळी निवडणुकीचा फॉर्म भरायचा असेल तर तो त्यांनी औरंगाबादहून भरावा, छत्रपती संभाजीनगराहून नाही. - राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिवसेना, शिंदे गट

एेतिहासिक शहराचे नाव बदलू नका : जमियत औरंगाबाद नामांतराविरोधात शुक्रवारी जमियतुल उलमा-ए-हिंदने विभागीय उपायुक्त मणियार यांना देत आमच्या संघटनेच्या दीड लाख सदस्यांचा नामांतरास विराेध असल्याचे सांगितले. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. याची जगात ओळख आहे. औरंगजेबाने हे नाव ठेवलेले नाही तर त्या वेळच्या नागरिकांनी शहराला आैरंगाबाद नाव दिले आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शहरातील विविध शासकीय कार्यालयांत नामफलक बदलले जात आहेत. याचा संघटनेने विरोध केला. या वेळी शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजीम, सचिव मौलाना कैसर खान, मुस्तफा खान आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...