आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट स्पर्धा:एमसीए लीगमध्ये छत्रपती संभाजीनगर - परभणी सामना बरोबरीत, अमित पवारचे अर्धशतक

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित 19 वर्षाखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी यजमान छत्रपती संभाजीनगर व परभणी यांच्यातील सामना बरोबरी राहिला. मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर संघाला विजयी घोषित करण्यात आले.

पहिल्या डावात छत्रपती संभाजीनगरने 55.2 षटकांत सर्वबाद 157 धावा उभारल्या. परभणीने पहिल्या डावात 49.1 षटकांत सर्वबाद 150 धावा केल्या. संघ 7 धावांनी पिछाडीवर राहिला. दुसऱ्या डावात मंगळवारी छत्रपती संभाजीनगरने 50.3 षटकांत 8 बाद 188 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात दिवस अखेर परभणीने 16 षटकांत 1 बाद 42 धावा केल्या.

अमित पवारचे अर्धशतक

दुसऱ्या डावात छत्रपती संभाजीनगरच्या राम राठोडने 45 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकार खेचत 21 धावा केल्या. कर्णधार हरिओम काळेने 22 चेंडूंत 22 धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या अमित पवारने 71 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने 118 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार लगावले. सिद्धांत भामरेने 47 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 32 धावा जोडल्या. अनिकेत जाधवने 17 व श्रेयस बनसोडने 11 धावा केल्या. परभणीच्या मधुश जोशीने 40 धावांत 5 गडी बाद केले. गोविंद हिंगने, सौरभ शिंदे व अनिकेत ताटेने प्रत्येकी एकाला टिपले.

परभणीच्या 42 धावा

प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवस अखेर परभणीकडून सलामीवीर क्षीतिज चव्हाणने 34 चेंडूंत 3 चौकारांसह 17 धावा केल्या. त्याला श्रीनिवास लेहेकरने पायचित केले. विन मुशेतवाड 48 चेंडूंत 3 चौकार खेचत 18 धावांवर नाबाद राहिला. आदित्य कोंडावरने नाबाद 5 धावा केल्या. ऋषिकेश कुंडने 4 षटकांत अवघ्या 4 धावा दिल्या. त्याने 3 षटके निर्धावदेखील टाकली.