आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपडा साफ झालाच नाही:ऑलआऊट ऑपरेशनमध्ये अवघे सहा आरोपी अटकेत, रस्त्यावर उतरले 88 अधिकारी, 545 कर्मचारी

छत्रपती संभाजीनगर​​​​​​​एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाेलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बुधवारी रात्री गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी परंपरागत ‘ऑलआऊट ऑपरेशन’ माेहीम राबवली. साधारण दहा तास ऑपरेशन चालणे अपेक्षित असताना अवघे तीन तासच ही मोहीम चालली. परिणामी पोलिस अवघे ३८ गुन्हे दाखल करून ६ गुन्हेगारांना अटक करू शकले. त्यामुळे आयुक्त लोहिया यांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर पोलिस दलाचे पहिलेच ऑपरेशन फेल झाल्याची चर्चा सुरू होती.

पोलिस आयुक्त नव्याने रुजू झाल्यानंतर सामान्यत: सुरुवातीचे काही दिवस गुन्हेगार पकडणे, त्यांचा शोध घेणे, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी तपासणीसह अवैध धंद्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यासाठी ‘ऑलआऊट ऑपरेशन’ राबवण्यात येते. डॉ. निखिल गुप्ता यांच्या बदलीनंतर आठ दिवसांपूर्वी लोहिया यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर बुधवारी रात्री ११ वाजता ही मोहीम राबवण्यात आली. मात्र, पावसामुळे पोलिसांच्या या कारवाईत मोठा व्यत्यय आला.

रात्रीतून रेकाॅर्डवरील १२४ गुन्हेगार तपासले

८८ पोलिस अधिकारी, ५४५ पोलिस कर्मचारी असे एकूण ६३३ पोलिस रस्त्यावर उतरले होते. यात २५ अवैध धंदे, अवैध दारू २५, जुगार १, अवैध धारदार शस्त्रे ५ अशा कारवाया करण्यात आल्या. त्याव्यतिरिक्त ६ फरार आरोपींना अटक करण्यात आली, तर १२४ रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले.

अवैध वाळूचा व्यवसाय गायब

गेल्या चार महिन्यांत शस्त्रे दाखवून लूटमारीच्या ३० पेक्षा अधिक घटना घडलेल्या असूनही पोलिसांना शस्त्रे बाळगणारे अवघे ४ आरोपी सापडले. ६३३ कर्मचारी रस्त्यावर असताना केवळ ६२२ वाहने तपासली. अवैध वाळूचा व्यवसायही दिसला नाही, हेही विशेष.