आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणूक:सतीश चव्हाण यांचे विश्वासू सुनील मगरेंचा 2 मतांनी पराभव; उत्कर्षचे 6 तर मंचच्या 2 सदस्यांची बाजी

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ७१ सदस्यीय अधिसभेतून ८ व्यवस्थापन परिषद सदस्स्यांची निवडूणक पार पडली आहे. भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने जोरदार बाजी मारत सहा जागा पटकावल्या आहेत. ‘उत्कर्ष’चे नेते आमदार सतीश चव्हाण यांचे विश्वासू सुनील मगरे यांचा मंचच्या योगिता होके पाटील यांनी दोन मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे सभागृहाचे तिन्ही सदस्य आमदारांनी मतदानात भाग घेतला आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या १० सदस्यांची निवडणूक होणे बाकी आहे. पैकी ८ सदस्य अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेतून निवडून जातात. रविवारी (१२ मार्च) निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी प्रक्रिया पार पाडली. एकनाथ शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले, काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड यांनी मतदान करून सभागृह सोडले.

उत्कर्षच्या ८ पैकी ४ सदस्यांना बिनविरोध विजयी घोषित करून त्यांना कुलगुरूंच्या हस्ते प्रमाणपत्र दिले. त्यात नितीन जाधव (संस्थाचालक), दत्तात्रय भांगे (पदवीधर), डॉ. गौतम पाटील (प्राचार्य) अणि डॉ. रवीकिरण सावंत (प्राध्यापक) यांचा समावेश आहे. उर्वरित ४ सदस्यांसाठी निवडणूक झाली. त्यात पदवीधरच्या सर्वसाधारण प्रवर्गातून योगिता होके पाटील यांनी 36 मते घेतली. त्यांनी सुनील मगरे (34) यांचा दोन मतांनी पराभव केला. प्राध्यापक मतदासंघात तिरंगी लढत झाली. यात डॉ. अंकुश कदम पहिल्या फेरीतील प्रथम पसंतीच्या (34) मतांच्या जोरावर विजयी झाले. मंचचे डॉ. भगवानसिंग ढोबळ (34) आणि डॉ. शंकर अंभोरे यांना फक्त 12 मते मिळाली.

बसवराज मंगरूळे यांनी मारली बाजी

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मंचचे संस्थाचालक संवर्गातील उमेदवार बसवराज मंगरुळे यांनी तब्ब्ल चाळीस मते घेतली. त्यांनी उत्कर्षच्या गोविंद देशमुख यांचा दहा मतांनी पराभव केला. प्राचार्य गटातून उत्कर्षचे डॉ. भारत खंदारे यांनी 37 मते घेत मंचच्या डॉ. विश्वास कंधारे (33) यांचा चार मतांनी पराभव केला.

नामनिर्देशन करताना झाला खल

अधिसभेच्या विविध गटातून पाच सदस्यांना तीन समित्यांवर नामनिर्देशन केले जाते. त्यात विद्या परिषदेवर डॉ. मेहेर पाथ्रीकर, स्थायी समितीवर डॉ. हरिदास विधाते, अध्यापक गटातून डॉ. विक्रम खिल्लारे, तर पदवीधर मधून सुभाष राऊत यांचे नामनिर्देशन करण्यात आले. तक्रार निवारण समितीवर अध्यापक गटातून डॉ. उमाकांत राठोड आणि शिक्षकेतर कर्मचारी गटातून सुधाकर चव्हाण यांना नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपकुलसचिव आय. आर. मंझा आणि व्यंकटेश लांब यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...