आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘माझ्या पतीचा कोरोनाने नव्हे तर मित्रांच्या मारहाणीत खून झाला आहे. मात्र, कोरोनाचे कारण सांगून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नाही,’ असा धक्कादायक आरोप बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने केला आहे.
त्याच्या कुटुंबाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर या तीन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मृताच्या १० मित्रांचा समावेश आहे.
वाळूज पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई देविदास इंदोरे यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मित्र अशोक कारभारी शिंगारे व अन्य मित्रांसोबत अंमळनेर येथे खासगी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीत म्हटले की ‘९ एप्रिल, २०२१ रोजी देविदास हे पत्नी, मुलांसह बेगमपुरा येथील घरात असताना पंकज जगदीश बत्तिशे हा मित्र त्यांच्या घरी आला आणि त्यांना विद्यापीठ परिसरात घेऊन गेला. तेथे अशोक व अन्य लोकांनी मारहाण करून त्यांना रिक्षात बसवले. रात्री नऊ वाजता देविदास यांनी पत्नीला कॉल करून अशोक व अन्य लोक कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या करण्यासाठी धमकावत आहेत, असे सांगितले.
त्याच्या काही तासांनंतरच एका व्यक्तीने कॉल करून माझ्या पतीला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. रुग्णालयात गेलो असता बाहेर उभ्या लोकांनी कोरोनाचे कारण देत आम्हाला भेटू दिले नाही. बऱ्याचदा विनंती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला पतीला भेटण्याची परवानगी दिली असता देविदास यांनी मला अशोकने फसवल्याचे सांगितले. शांतीलाल बत्तिसे याचा अंडरवर्ल्ड गँगशी संबंध असल्याचे सांगत मला धमकावत घात केल्याचा वारंवार उल्लेख माझे पती करत होते.’
यांच्यावर गुन्हा दाखल
याप्रकरणी देविदास इंदोरे यांची पत्नी वर्षा व वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपास करत जबाब नोंदवले. मात्र, खुनाचा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे अखेर कुटुंबाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करून पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून अशोक शिंगारेसह सुभाष निकम, पंकज बत्तिशे, संतोष पंढुरे, बंडू इंदोरे, उमेश हजारे, किशोर गायकवाड, भारत गोरे व देशपांडे, उत्तम ठोकड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विशाल बोडखे तपास करत आहेत.
विषप्रयोग केल्याचा संशय
पुढे तक्रारीत म्हटले की, ‘११ एप्रिल रोजी व्हेंटिलेटरचे कारण दाखवत पतीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १२ एप्रिलला पहाटे चार वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे अंत्यसंस्कार कुणी, कुठे केले, हेही आम्हाला सांगितले नाही. त्यामुळे आर्थिक वादातून कंपनीचे भांडवल हडप करण्यासाठी दहा जणांनी मिळून कट रचून त्यांच्यावर विषप्रयोग करून खून केल्याचा संशय आहे.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.