आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:मुख्यमंत्री तर कॅप्टन, त्यांची टीम मात्र फील्डवर : पवार, मी फिरतो कारण मला लोकांमध्ये मिसळण्याची सवय

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आम्हीच त्यांना आग्रह करून मुंबई सोडू नका असे सुचवले’

‘मी फिरतो कारण मला लोकांमध्ये मिसळण्याची सवय आहे. कितीही मोठे संकट असले तरीही मी फिरतोच. अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही फिरावे असे अजिबात नाही. ते कॅप्टन आहेत. त्यांची टीम फील्डवर आहे..!’, असे शरद पवार यांनी औरंगाबादेत बोलताना सांगितले. ठाकरे यांची पाठराखण करत ते म्हणाले, “आम्हीच मुंबई सोडू नका असा त्यांना आग्रह केला आहे.’

कोरोना महामारीने हैराण जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी औरंगाबादच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आम्हीच त्यांना आग्रहपूर्वक सांगितले आहे की, आपण मुंबईच्या बाहेर पडू नका. कारण कोरोनाचे संकट संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी एखाद-दुसऱ्या जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेतल्याने काहीही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा त्यांनी मुंबईतून प्रत्येक जिल्ह्यामध्ये लक्ष घालावे. शिवाय कॅप्टन एका ठिकाणी असले तरी चालते. त्यांची टीम फील्डवर आहे.’

याबाबत उदाहरण देताना पवार म्हणाले, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई दौरा करतात आणि ठाकरे यांना मुंबईत जाऊन अहवाल देतात. शिवाय टोपे राज्यभर फिरत आहेत. एखादी परवानगी लागत असेल तर मुख्यमंत्री त्वरित देतात. त्यामुळे त्यांना दौरा करण्याची आवश्यकता नाही. मला एका ठिकाणी बसवत नाही म्हणून सतत फिरत असतो. शिवाय मला लोकांमध्ये राहण्याची सवय आहे. म्हणून मी या संकटाचा आढावा घेत आहे.’

पवार म्हणाले...
- तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यावर महाराष्ट्रात उत्तम उपाययोजना केल्या जात आहेत.
- मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि औरंगाबादची स्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. पण त्यात सातत्याने सुधारणा होत आहेत.
- राज्याचा सरासरी मृत्युदर कमी होत आहे. मुख्यमंत्री सकाळपासून पूर्णवेळ कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काम करत आहेत.
- तज्ज्ञांच्या मते, ऑगस्टमध्ये कोरोनाचा ‘पीक पीरियड’ येणार आहे. त्यामुळे रुग्णालयांची आणि बेड्सची संख्या वाढवण्यावर आमचा भर आहे.