आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचे सहकारी होऊ:आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांची त्याच साबनाने धुलाई केली; शिंदेंची ठाकरेंवर टीका

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदींचा सहकारी होऊ. आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांची आम्ही त्याच साबनाने धुलाई केली, अशी टीका सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

मुख्यमंत्री शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नाराजी नाट्यावर भाष्य केले. शिवाय सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.

पन्नास आमदार पुरून उरले

मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि आम्ही विरोधकांकडे गेलो.

मी आमदारांचा वनवास संपवला

मुख्यमंत्री म्हणाले, पन्नास आमदार विरोधकांच्या गोटात जातात हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आमच्यामागे लाखो लोकांचे आशीर्वाद होता. मला भाजप, शिवसेनेच्या लोकांनी माझी स्तुती केली. मी चांगले काम करुन त्यांचा वनवास संपवला. अडीच वर्षे समाजात नकारात्मक भाव होते. आम्ही हे जाणले आणि लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी पाऊले उचलली. लोकभावनेला हात घालून दहिहंडी आणि गणेशोत्सवातील बंधने मोकळी केली.

माझ्यातील कार्यकर्ता मरणार नाही

मुख्यमंत्री म्हणाले, फोटो काढायला लोक माझ्याकडे येतात. मी कधीच फोटोग्राफर घेऊन जात नाही. बाकी लोक कुठे कॅमेरे घेऊन जातात मला माहीत नाही. त्यांचे त्यांनाच माहीतेय. काही लोक म्हणतात, मुख्यमंत्री घरच्या गाठीभेटी घेतात. पण मी सांगतो कालपर्यंत मी त्यांच्याकडे जात होतो. आज मुख्यमंत्री झालो तर मी त्यांच्याकडे का जाऊ नये. लोक मला म्हणतील की, हा बदलला. मी माझ्यातील कार्यकर्ता मरू देणार नाही.

टीका करणे विरोधकांचा धंदा

मुख्यमंत्री म्हणाले, टीका करणे विरोधकांचा धंदा आहे, त्यांना टीका करू द्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार पहाटे सहापासून कामाला लागतात. मी त्यांना सांगतो की, मी सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांचे काम करतो.

सभेतील माणसे प्रेमाची

मुख्यमंत्री म्हणाले, चांगले काम आपल्याला करायचे आहे. एवढेच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी मला शिकवले. सर्व आपली माणसे सभेत आहेत. ते आपल्या प्रेमापोटी येतात. काही सभा मी पाहिल्या. राष्ट्रवादीचे लोक काही सभेत पाठवले जातात. आमची गर्दी तशी नाही. विरोधकांच्या शब्दकोशात फक्त खोके हेच शब्द आहेत.

देव्हारा आम्ही 50 जणांनी संभाळला:शहाजी पाटलांची ठाकरेंवर टीका; गर्दी पाहण्यासाठी खैरे अन् दानवेंना कोपऱ्यात खुर्ची द्यायला हवी होती

ठाकरेंची हिंदुत्वाशी प्रतारणा

मुख्यमंत्री म्हणाले, जे कधी करायला नको होते ते त्यांनी केले. त्यांच्या खोक्यांचा हिशोब मी आज काढत नाही. मतदार आणि हिंदुत्वाशी प्रतारणा, विश्वासघात कोणी केला हे त्यांना माहित आहे. हे राज्य सामान्यांचे आहे. या राज्यात सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांना नुकसानीसाठी भरघोस निधी देत आहोत.

शिंदे - फडणवीस सरकार बरखास्त करा:हे गुडांचे सरकार आहे?, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

निधी कमी पडू देणार नाही...

मुख्यमंत्री म्हणाले, पाणीपुरवठ्याला निधी कमी पडू देणार नाही. या भागाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे. वैजापूर-गंगापूर मतदारसंघात मराठवाडा वाॅटरग्रीडसाठी मंजूर झाले आहेत. हे सरकार काम करणारे सरकार आहे. दोन महिन्यात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री जनतेत फिरत असल्याची भिती त्यांच्या मनात आहे, म्हणूनच ते आरोप, टीका करीत आहेत.

सभेसाठी कुणालाच पैसे दिले नाहीत:कितीही क्लिपा सोडा, आता दानवे-खैरेंच्या पायाखालची वाळू सरकली; भुमरेंची टीका

ही वृत्ती संकुचित

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत. त्यांच्या सत्कारासाठी मी गेलो. त्यावर विरोधकांनी टीका केली. ही वृत्ती संकुचित आहे. अशा टीका त्यांनी करायला नको होत्या. हा जयंत पाटील आणि विरोधकांचा कद्रुपणा आहे.

विरोधकांना मळमळ

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जयंत पाटील यांना विरोधीपक्षनेता व्हायचे होते. त्यांना अजित दादांच्या दादागिरीने थांबवले म्हणून जे काही झाले ते उघडपणे बाहेर आले. शिंदे गटावर एका अग्रलेखात टीका झाली. त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय काहीच नाही. टीकेचे तीन डोस घेतल्याशिवाय विरोधकांची मळमळ थांबत नाही.

मराठीचा ठाकरे गटाला पुळकाच

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईचा ठाकरे गटाला एवढा पुळका असेल, तर मुंबईत मराठी माणूस किती उरले याची आकडेवारी आणि विश्लेषणही ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्रात करायला हवे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची हे फक्त निवडणुकापुरते ते बोलतात. त्यानंतर मुंबईतील माणसांना सोडून द्यायचे.

कुणी धोका दिला?

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे अशी टीका झाली, पण याच साबनाने ठाकरे गटाची मस्त धुलाई केली. बाळासाहेबांना कुणी धोका दिला हे तुम्हीच ठरवा. याकूब मेमन देशद्रोही होता त्याच्या कब्रस्थानाचे उद्दात्तीकरण मविआने केले. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा कलम 370 सोबत चांगले निर्णय घेतले त्यांचे सहकारी व्हायला काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी केला.

कामातून उत्तर देतो

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही कामातून उत्तर देत आहोत, म्हणून लोकांचे आम्हाला समर्थन आहे. ही वस्तूस्थिती पाहा मग आमच्यावर टीका करा. हे सरकार सामान्यांचे आहे. माझ्यावर कंत्राटी मुख्यमंत्री आहे, पण मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसह राज्याच्या समस्या सोडविण्याचे कंत्राट घेतले आहे. तुम्हाला काय म्हणायचे ते म्हणा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेत जमलेला जनसमुदाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेत जमलेला जनसमुदाय.

पैठणमध्ये सभेच्या व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेव दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयो मंत्री संदीपान भुमरेंसह दिग्गजांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे शिंदे यांचे समर्थकांनी विमानतळावरच जोरदार स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर मंत्री संदीपान भुमरे यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर मंत्री संदीपान भुमरे यांनी स्वागत केले.

विमानतळावर दिग्गजांची उपस्थिती

मुख्यमंत्री शिंदे यांचे मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, आमदार हरिभाऊ बागडे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाट, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, सिडकोच्या प्रशासक दीपा मुधोळ यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत, दादाजी भुसे, दीपक केसरकर, शंभूराज देसाई , संजय राठोड, आमदार प्रदीप जयस्वाल यांचीही उपस्थिती आहे.

विमानतळावर केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
विमानतळावर केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे आणि शिवसेनेत वाद पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याच्या घटना देखील घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद ते पैठण आणि पैठण ते पाचोड असा रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस पाइंट देण्यात आले आहेत. तर जिल्हाभरातील ग्रामीण पोलिसांना बंदोबस्तसाठी पैठणमध्ये पाचारण करण्यात आले आहे. खुद्द पोलिस अधीक्षक कालपासून सभास्थळी असून, सुरक्षेचा आढावा घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...