आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुंडलिकनगरात वाढती दहशत:कश्यप गँग गुंडांच्या त्रासामुळे मुलाची आत्महत्या, पोलिसांचे मात्र आरोपीला अभय; वडिलांची तक्रार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांनी केला नव्हता स्पॉट पंचनामा

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गँगच्या गुंडांची दादागिरी वाढत असताना पोलिसांचे मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यांच्याविरोधात कुणी तक्रार करायला गेले तर त्यावर कारवाई करणे सोडा, गुन्हा दाखल करून घेण्यासही पोलिस टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी आहेत. दुर्लभ कश्यप गँग टोळीतील एका गुंडाच्या त्रासामुळे एका १७ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. मात्र पोलिसांनी अद्यापही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची तक्रार मृत मुलाचे वडील संतोष सुरवसे यांनी पोलिस आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

संताेष सुरवसे यांना तक्रार अर्जात म्हटले आहे, ‘विजयनगर येथे राहणारा १७ वर्षीय आयुष संतोष सुरवसे हा १४ एप्रिल रोजी दुपारी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त घराबाहेर पडला. रात्री दीडच्या सुमारास तो घरी परतत असताना तोंडओळख असलेल्या रोहित म्हस्के याने त्याला थांबवून पैशांची मागणी केली. आयुषने पैसे नसल्याचे सांगताच रोहितने वस्तऱ्याने त्याच्या हातावर वार करत त्याला मारहाण केली. राेहित हा दुर्लभ कश्यप गँगचा सदस्य असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर घाबरलेला आयुष तक्रार देण्यासाठी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गेला असता त्याला तिथे बराच वेळ पोलिसांनी बसवून ठेवले.

नंतर मेडिकल मेमो देत घाटीत वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. वैद्यकीय अहवालात डाॅक्टरांनी मारहाण (फिजिकल असॉल्ट) झाल्याचे लिहून दिले. यानंतरही पोलिसांनी मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल न करता पहाटे चार वाजता अदखलपात्र (एनसी) एवढीच नोंद केली. या वेळी आयुषने गुन्हा दाखल करा, अशी विनंती केली असता दुसऱ्या दिवशी (१५ एप्रिल) पोलिस ठाण्यात येण्यास त्याला सांगितले.

सतत दोन दिवस ठाण्यात बसवून ठेवले, अर्ज न घेता पुन्हा ये म्हणून पाठवले १५ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता आयुष घरी येऊन झोपला. सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिस ठाण्यात जाण्यासाठी घरातून गेला. पोलिसांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याला ठाण्यात बसवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बाेलावले. पोलिस गुन्हा दाखल करून घेत नसल्याने निराश झालेला आयुष घरी गेला. यानंतर रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास आयुषचा मोठा भाऊ चंद्रशेखर कामावरून घरी आला असता त्याला आयुषने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. भाऊ जोरात किंचाळल्यानंतर गच्चीवर झोपलेले आयुषचे आई-वडील खाली आले. त्याला फासावरून उतरवत तत्काळ खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांना तपासून मृत घोषित केले, असे आयुषच्या वडिलांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. याप्रकरणी दाखल एनसीचा तपास पोलिस हवालदार हिंगे हे करत आहेत, तर आत्महत्या केल्याप्रकरणी अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक आनंद बनसोडे हे करत आहेत.

मृत अल्पवयीन असतानाही सज्ञान दाखवला
मृत आयुषची जन्मतारीख आधार कार्डनुसार २४ सप्टेंबर २००४ आहे. आत्महत्या केली त्या वेळी त्याचे वय १७ वर्षे ७ महिने असल्याचे दिसून येते. तरी पोलिसांनी दाखल केलेल्या एनसीमध्ये १८ वर्षे आणि शवविच्छेदन अहवालात १९ वर्षे नमूद केल्याने पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे.

रोहित म्हस्के कश्यप गँगचा सदस्य..आयुषला ज्या रोहित म्हस्के नामक
आरोपीने थांबवून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली, तो कश्यप गँगचा सदस्य असल्याचे संतोष सुरवसे यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

कश्यप गँगची दहशत..
भारतनगर परिसरात कुख्यात गुंड दुर्लभ कश्यप नावाचा चौक उभारणाऱ्या या गँगची परिसरात दहशत आहे. चार महिन्यांपूर्वी या गुंडांनी रेणुकानगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शुभम विनायक मनगटे या २४ वर्षीय युवकाच्या डोक्यात फायटर आणि तलवारीने वार करत गंभीर जखमी केले होते. शुभमला या मारहाणीत ७० टाके पडले होते. या गुंडांना अटकाव घालण्यात मात्र
पोलिसांना यश आलेले दिसत नाही.

पोलिसांची अरेरावी..
१५ एप्रिल रोजी आयुषने फोनवरून मुंबई येथील त्याच्या आत्याचा मुलगा ऋषिकांत सोनवणे याला घडलेली घटना सांगितली हाेती. “रोहित म्हस्के याने माझ्यावर वस्तऱ्याने हल्ला करत जिवे मारण्याची धमकी दिली, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. उलट मलाच अरेरावीची भाषा करत आहेत. घरी कुणाला सांगू नको, मी करतो बरोबर,’ असे पोलिसांनी सांगितल्याचे आयुषच्या फोनवरील रेकॉर्डिंगवरून स्पष्ट होते.

दाेन दिवस उशिराने पंचनामा केला
१५ एप्रिल रोजी आयुषने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ स्पॉट पंचनामा करणे गरजेचे होते. मात्र पोलिसांनी तसे केले नाही. मृत आयुषचे वडील संतोष सुरवसे यांनी स्वत: पोलिस ठाण्यात जात स्पॉट पंचनामा करण्याची विनंती केली. त्यावर ‘दोन तर दिवस झाले आत्महत्या करून’ असे उत्तर पोलिसांनी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांनी १७ एप्रिल रोजी पंचनामा केल्याचे सुरवसे यांच्या अर्जात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...