आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बच्चे कंपनी ठरतेय कोरोनाची सुपर स्प्रेडर; लक्षणे दिसत नसल्याने चाचण्या हाेत नाहीत

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशी घ्यावी काळजी : त्रिसूत्री पाळा, अाजार अंगावर काढू नका

औरंगाबादमध्ये लहान मुलांमध्येही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालयात ताप आल्यानंतर तपासणीसाठी अालेल्या अनेक मुलांची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाणही वाढत आहे. विशेष म्हणजे लहान मुले बाधित झाली तरीही त्यांच्यात फारशी लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे चाचणी करण्याच्या भानगडीत ना पालक पडतात ना डाॅक्टर. मात्र याच कारणामुळे ही बाधित मुले सुपर स्प्रेडर ठरत आहेत. त्यांच्या माध्यमातून आई-वडील व घरातील इतर व्यक्तींनाही लागण हाेण्याचे प्रकार वाढताना दिसतात. बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी हे निरीक्षण नाेंदवले.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून रोज एक हजार ते दीड हजारपेक्षाही अधिक रुग्ण निघत आहेत. गेल्या वर्षी काेराेनाचा पीक हाेता तेव्हाही लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण खूपच नगण्य होते. पण आता दुसऱ्या लाटेत लहान मुलांना झपाट्याने लागण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लूझ मोशन, पोट दुखणे, डायरिया ही लक्षणे : डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिषेक परळीकर यांनी सांगितले की, लहान मुलामध्ये हायग्रेड फीव्हर, लूझ मोशन आणि अशक्तपणा अशी लक्षणे आढळून येत आहेत. तीन ते चार दिवसांत लूझ मोशन कमी होते. अशक्तपणा कमी होण्यास मात्र आठवडा लागतो. पूर्वी साधारण या लक्षणांचे राेज दोन किंवा तीन रुग्ण येत होते. मात्र, आता पाच ते बारा वर्षे वयोगटातील २५ ते ३० टक्के मुलांना हा हायग्रेड फीव्हर होत आहे. तपासणीनंतर ही मुले कोरोना पॉझिटिव्हही निघत आहेत. अर्थात, कोरोनाची लागण झाली तरीही या मुलांना श्वास घ्यायला त्रास होणे, रक्तदाब कमी होणे असा त्रास नाही. लूझ मोशन, पोट दुखणे, डायरिया होणे, डिहायड्रेशन एवढाच त्रास होतोय. उपचारानंतर मात्र तीन-चार दिवसांत लूझ मोशनचे प्रमाण कमी होते, तर थकवाही साधारण आठवडाभराच्या उपचारानंतर जातो. त्यांच्यावर मोठ्या व्यक्तींसारखे उपचार करण्याची गरज भासत नाही.

अशी घ्यावी काळजी : त्रिसूत्री पाळा, अाजार अंगावर काढू नका

  • घाटीतील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खैरे यांनी सांगितले, ‘मुले घराबाहेर खेळायला जात असतात तेव्हा त्यांनी काळजी घ्यायला हवी. मास्क घालूनच घराबाहेर पडावे. गर्दीत जाणे टाळावे व घरी परतल्यानंतर अाधी हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीचा मुलांनी वापर करावा. हे नियम पाळले जात अाहेत की नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे.
  • मुलांना किरकाेळ अाजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. अाजार अंगावर न काढता तातडीने डाॅक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

संसर्ग वाढला; मृत्यूचा धोका नाही
बालरोगतज्ज्ञ डॉ. आर. आर. खडके यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या कोरोना लाटेत मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण खूप कमी होते. मात्र, आता ते बऱ्यापैकी वाढले आहे. मुलांचा पॉझिटिव्हिटीचा रेट वाढला आहे. जी मुले बाहेर फिरतात, खेळायला जातात त्यांना त्रास होत आहे. पूर्वी ओपीडीत १०० मुले तपासल्यानंतर पाच ते सहा जणांना त्रास दिसत होता. मात्र, आता १०० पैकी २० ते ३० मुले बाधित होताना दिसत आहेत. मुलांमध्ये काेराेनाची लागण झाली असली तरी सुदैवाने मृत्यूसारखी परिस्थिती मात्र ओढवत नाही. फक्त डोळे व चेहरा लाल होण्यासारखा प्रकार दिसतो. बाधित मुलांच्या माध्यमातून त्यांचे आई-वडीलही बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही मुले खेळायला गेल्यानंतर त्याचा परिणाम अधिक होत आहे.

प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा अधिक
बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते म्हणाले, मुले बाधित होण्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे. मात्र मृत्यूचा धोका नाही. काही प्रमाणात मुले खेळायला, क्लासला जात आहेत. त्यामुळे ती बाधित होत आहेत. मुले ही सुपर स्प्रेडर असतात. त्यांना लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे त्यांची टेस्टिंगही होत नाही. परिणामी ती बाधित असल्याचे लक्षातच येत नाही. यामुळे त्यांच्यापासून कोरोनाचा प्रसार जास्त होतो.

वर्षभरात घाटीत फक्त पाच मृत्यू
घाटीत गेल्या वर्षभरात २५ मार्चपर्यंत १० वर्षांच्या आतील ४९ मुले व ३८ मुली मिळून एकूण ८७ जण भरती झाले होते. त्यामध्ये ३ मुले आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तर ११ ते २० या वयोगटातील १८३ मुले भरती झाली होती. त्यामध्ये ७८ मुले आणि १०५ मुलींचा समावेश होता. यातून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यात घाटीत १२ वर्षांखालील १७ मुले दाखल झाली अाहेत. या महिन्यात वातावरण बदलल्यामुळे लहान मुलांमध्ये अाजार वाढले अाहेत. लूझ माेशनचे प्रमाण वाढले अाहे. यासह ताप, उलटी असा त्रास हाेत असेल तर लगेच डाॅक्टरांना दाखवा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. डाॅक्टरांनी सांगितलेल्या चाचण्याही तातडीने करून घ्या.
खेळण्यासाठी बाहेर गेल्यानंतर लागण, नंतर कुटुंबातील व्यक्तींनाही हाेतेय बाधा; पाच ते बारा वर्षे वयोगटातील २५ ते ३० टक्के मुलांना आजार

बातम्या आणखी आहेत...