आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर:दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा माता-पित्याने लावला बालविवाह, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वैजापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लैंगिक शोषण काही दिवसांपूर्वीच मुलीवर अत्याचार केल्याचे झाले हाेते उघड

अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप आणि त्यांच्या मित्रांनी लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींचा आई-वडिलांसह इतरांनी परप्रांतीय लोकांशी बालविवाह करून दिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील मोंढा मार्केट परिसरात समोर आला. दरम्यान, एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर शारीरिक व लैंगिक अत्याचार करण्याचा गंभीर प्रकार तिच्या आई-वडिलांना काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळीने जबरदस्तीने व आर्थिक प्रलोभन दाखवून केल्याची चर्चा येथे होत आहे. विशेषतः स्थानिक पोलिस ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांशी या प्रकरणातील आरोपीचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्याचे धाडस त्यांनी केल्याचे बोलले जात आहे.

मोंढा मार्केट परिसरात एका अल्पवयीन १४ वर्षीय मुलीचा सावत्र बापासह अन्य एकाने लैंगिक छळ केल्याचे प्रकरण दोन दिवसांपूर्वी घडले होते. पोलिसांनी त्या प्रकरणात गुन्हा दाखल करून महिला पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. याच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींचा आई-वडिलांनी लासूर स्टेशन येथील एक महिला व मालेगाव येथील एका एजंटामार्फत गुजरात प्रांतामधील दोन जणांशी बालविवाह लावून दिल्याच्या प्रकाराचा भंडाफोड पीडित अल्पवयीन मुलींनी पोलिस ठाणे गाठून उघडकीस आणला. या दोन्ही प्रकरणांत स्थानिक पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुली व त्यांच्या नातलगांची तक्रार दाखल करून न घेता त्यांना हुसकावून लावल्यामुळे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे दाद मागितल्यानंतर त्यांच्यावरील अन्यायाची दखल पोलिसांनी घेतली.

१५ व १६ वर्षीय अशा दोन मुली घरी असताना आई-वडिलांनी त्यांना आपल्याला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे नातलगांकडे जायचे असल्याची बतावणी करून ते दोघींनाही घेऊन गेले. त्यांच्यासमवेत गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील फरजाना (पूर्ण माहिती नाही) नावाची महिलाही होती. मालेगाव येथे गेल्यानंतर तेथे त्यांनी वहाब चाचा (पूर्ण नाव माहीत नाही) नावाच्या व्यक्तीची भेट घेतली. त्यानंतर पालकांनी व दोन मुलींनी मालेगावात चार-पाच दिवस मुक्काम केला. या मुक्कामानंतर आई-वडिलांनी दोघींनाही अचानक तुम्हा दोघींचेही गुजरातमधील व्यक्तींशी लग्न जमवले असल्याचे सांगितल्यानंतर दोघींनाही धक्का बसला. त्यानंतर हे सर्व गुजरातमधील जामनगर येथे गेले. त्यानंतर त्या दोघींचे ८ व १० जून २०२१ रोजी अनुक्रमे अनय नरेंद्र पाडलिया व भावीण रमेश विसावाडिया या दोघांशी लग्न लावून दिले. त्या दोघी लग्न लावून त्यांच्याकडे घरी गेल्यानंतर मुलींनी आमचे लग्नाचे वय नसल्याचे सासरकडील मंडळींना सांगितले. त्यामुळे त्यांनी दोन महिन्यांनतंर दोघींनाही वैजापूर येथे घरी आणून सोडले. घरी आल्यानंतर त्यांनी ही आपबीती मामांसह आई व मावशीला सांगितली. केवळ आई-वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी हा प्रकार आतापर्यंत कुणाला सांगितला नव्हता. याप्रकरणी सावत्र बापासह सख्खी आई, फरजाना व वहाब अशा चौघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणात आई-वडिलांसह लासूर स्टेशन येथील फरजाना, मालेगाव येथील वाहेद चाचा अशा चौघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एका लग्नापोटी आई-वडिलांनी ८० हजार रुपयांप्रमाणे दोन लग्नांचे एक लाख ६० हजार रुपये घेतल्याचा दुजोरा पोलिसांनी दिला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दोन अल्पवयीन मुलींचे थेट गुजरातमधील दोघांशी बालविवाह लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बातम्या आणखी आहेत...