आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या उपस्थितीत घेणार बालकांच्या वजन, उंचीची नोंद:पोषण माह निमित्त 7 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायतस्तरावर राबवणार उपक्रम

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोषण सप्ताहांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा, समुदाय आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षिका, वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व बालकांच्या वजन, उंचीची नोंद घेण्यात येणार आहे. 7 सप्टेंबरपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे.

सप्टेंबर-2022 हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. या कार्यक्रमात लोकांचा सक्रिय सहभाग असावा, त्यासाठी नियोजन करून, पोषण अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, पंचायत या विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यात सहभागी होऊन उपक्रम राबवण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार 7 सप्टेंबरपर्यंत सर्व बालकांची उंची, वजन घेणे, सॅम (गंभीरपणे तीव्र कुपोषित), मॅम (मध्यम तीव्र कुपोषित) बालकांसाठी तपासणी शिबीर घेणे, सॅम बालकांना तत्काळ व्हीसीडीसीमध्ये दाखल करणे. रोटरी, लायन्स क्लब व इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बालकांना एनआरसीमध्ये दाखल करणे, त्यांचा नियमित आढावा घेणे, महिलांचे स्वास्थ्य, बालकांचे शिक्षण, पोषण आहार, लिंगसमानता, पोषण भी पढाई भी आदी विषयांवर पाककृती स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी आदी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

तसेच 12 सप्टेंबरला अंगणवाडीतील मुलांची वैद्यकीय अधिकारी मधुमेह तपासणी करतील. 13 सप्टेंबर रोजी गर्भवती व स्तनदा महिला, किशोरवयीन मुली, तसेच 6 वर्षांखालील बालकांचे ॲनिमिया आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या वर्षी कोरोनामुळे बालकांचे वजन उंची घरोघरी जाऊन करण्यात अडचणी होत्या.पालकांमध्ये ही भीतीचे वातावरण होते.

न्यूट्रीशन फूड पाकीट

जिल्ह्यातील साडेचार हजार बालके ही कमी तीव्र वजनाची म्हणजे कुपोषित आढळून आली होती. त्या बालकांना अंगणवाडी सेविका आणि आशाताई मार्फत पोषक असे न्यूट्रीशन फूड पाकीट देण्यात आले आहेत.तसेच स्तनदा माता आणि गरोदर माता यांना बालकांच्या वजन आणि उंची नुसार आहार कसा असावा याची माहिती दिली जात असल्याचे महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...