आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लाडक्या कुत्रीने खेळता खेळता चक्क कुकरची शिटी गिळली; अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेत खडकेश्वरच्या पशुचिकित्सालयात पशुचिकित्सकांनी केली शस्त्रक्रिया

एखादा प्राणी पाळला की त्याच्यावर जीव जडतो. मग त्याची रोज काळजी घेणे ओघाने आलेच. त्याच्या आहारासोबत आजार, दुखणे हेही पाहणे आलेच. अशाच एाक लॅबरेडॉर जातीच्या नऊ महिन्यांच्या कुत्रीने खेळता खेळता चक्क कुकरची शिटी गिळल्याचे लक्षात आले आणि मग सुरू झाली तिचा जीव वाचवण्याची धडपड. अखेर या कुत्रीवर खडकेश्वर येथील शासकीय पशुचिकित्सालयात शस्त्रक्रिया करून शिटी बाहेर काढण्यात डॉक्टरांनी यश मिळवले. शहरातील भडकल गेट भागात राहणाऱ्या मयूर जमधडे यांच्याकडे नऊ महिन्यांची लॅबरेडॉर जातीची कुत्री आहे. आजवर फार प्रेमाने त्यांनी तिचा सांभाळ केला. वयात आल्यामुळे आठव्या महिन्यात तिचे ब्रिडिंग (रेतन) करण्यात आले.

ब्रिडिंगनंतर काही दिवसांनी ती गरोदर आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांनी तिचा एक्स-रे काढला. तेव्हा ती गरोदर तर नव्हतीच, उलट तिच्या पोटात कुकरच्या शिटीच्या आकाराची वस्तू असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मयूर यांनी १७ जुलै रोजी तिला शासकीय पशुचिकित्सालयात नेले. तिथे पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर. डिघोळे यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, मयूर यांना ती शिटी पोटातून नैसर्गिकरीत्या आपोआप बाहेर पडेल, असे वाटले. त्यांनी काही दिवस वाट पाहण्याचा निर्णय घेतला. मात्र, ती शिटी आपोआप पडली नाही. त्यामुळे त्यांनी ३ जुलै रोजी पुन्हा तिला पशुचिकित्सलयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

पोटावरील शस्त्रक्रियेसाठी एक दिवस उपाशी ठेवावे लागले
पोटावर शस्त्रक्रिया असल्याने तिला एक दिवस उपाशी ठेवण्यात आले होते. पोटात मुख्य आतड्यात ही शिटी रुतून बसलेली होती. अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही शिटी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगताच श्वानमालक मयूर यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. वल्लभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर. डिघोळे यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांना डॉ. अश्विनी राजेंद्र, डॉ. बेबीनंदा गायकवाड यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...