आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादच्या पाणीपुरवठ्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत आहेत. २ जून रोजी त्यांनी मुंबईतून कानउघाडणी केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. ८ जूनच्या दौऱ्यात त्यांनी आणखी काही सूचना दिल्या. त्यानंतर अनेक कामांना वेग आला. शुक्रवारी (१७ जून) ठाकरेंनी पुन्हा आढावा घेतला तेव्हा शहराला आता पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे दावे मनपाचे प्रशासक व इतर अधिकाऱ्यांनी केले. मात्र प्रत्यक्षात ‘दिव्य मराठी’ने सर्वाधिक टंचाईचे भाग असलेल्या सिडको-हडकोसह काही वसाहतींमध्ये जाऊन चौकशी केली असता तिथे अजूनही सात ते आठ दिवसांआडच पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. हनुमान टेकडी परिसरातील लोक म्हणाले, पूर्वी १५ दिवसांतून एकदा पाणी येत होते, ते आता सात-आड दिवसांआड मिळते. पण अजूनही रात्री दोन-अडीच वाजताच नळावर धावावे लागते. कारण दोन आठवड्यांपूर्वी बेगमपुऱ्यात तोडलेले अवैध नळ लोकांनी पुन्हा जोडून घेतले आहेत. एन-५, गुलमोहर कॉलनी येथील सीताराम मोरलवार म्हणाले की, कितीही आंदोलने केली, आमच्याकडे अजूनही सात दिवसांआड पाणी येते. ते किमान चार दिवसांआड आले पाहिजे. मंगेश मानकापे म्हणाले की, नळाला दहा मिनिटे केवळ हवाच येते. सिडको एन-९ चे रहिवासी हेमंत मुळे म्हणाले की, सात दिवसांआड पाणी येते, तेही ३० ते ४० मिनिटेच. उदयसिंग पाटील यांनी सांगितले की, पावसाळ्यात तरी वेळेवर पाणी द्यावे. गेल्या महिन्यात हनुमान टेकडी भागातील लोकांनी पाण्यासाठी मनपात आंदोलन केले होते. येथील रहिवासी सुनीता राठोड यांनी सांगितले की, १५ ऐवजी सात दिवस पाणी येते. पण ते पुरेसे नाही. रात्री-अपरात्री पुरवठा होत आहे. के. एम. भोज यांनीही अशीच व्यथा मांडली. पवननगर येथील अंजली देशमुख, अलका पाटील, प्रशांत मंडगे, किशोर कुचे, सतपालनगरातील सुरेखा भावसार, सुरेंद्र घोरपडे यांनीही पाणीपुरवठ्यात फारशी सुधारणा झाली नसल्याचे सांगितले.
उपलब्ध पाणीसाठा वाढवण्यासाठी नहर- ए- अंबरीच्या ७ चेंबरमधील गाळ पुण्यातील पाणबुड्यांकडून काढण्यात आला. यामुळे हिमायतबाग येथील सेटलिंग टँकद्वारे दिल्ली गेट जलकुंभात एक ते दीड लाख लिटर पाणी वाढले. शहागंज जलकुंभावरील ताण थाेडा कमी झाला. नहरीतील कचरा काढण्याचे काम पुण्यातील महाराष्ट्र अंडरवॉटर सर्व्हिसेसला देण्यात आले. १५ जून रोजी या संस्थेच्या चार पाणबुड्यांंनी मनपा कार्यकारी अभियंता किरण धांडे, एम. एम. बावस्कर यांच्या नेतृत्वात सावंगी ते हिमायतबागपर्यंतचे सात चेंबर स्वच्छ केले. त्यांनी किमान ट्रकभर कचरा, दगड, माती, प्लास्टिक काढले. लवकरच नहरींच्या जाळ्यातील सर्व चेंबरची स्वच्छता, डागडुजी, ढापे टाकणे आदी कामे केली जातील, अशी माहिती कार्यकारी अभियंता धांडे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.