आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरसेवक, आमदार, खासदारांची निवड शहरातील नागरिक करत असतील तर शहराचे नाव बदलण्याचा अधिकारदेखील जनतेला आहे. मुंबई-दिल्लीतील पाच लोक शहराचे नाव कसे काय बदलू शकतात, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात खासदार इम्तियाज यांचे भाषण झाले. या वेळी नागरिकांची मोठी गर्दी होती. इम्तियाज यांनी युवकांना आंदोलनादरम्यान कोणतीही हुल्लडबाजी करू नका. आंदोलनाची बदनामी होईल आणि त्याला गालबोट लागेल असे काहीही करू नका, असे आवाहन केले.
खासदार इम्तियाज म्हणाले की, ही लढाई सोपी नाही. मी तुमच्या जिवावर ही लढाई लढत आहे. माझ्याविरोधात गुन्हे दाखल झाले. माझे पुतळे जाळले जात आहेत. माझ्या शहराची ओळख मोडण्याचे प्रयत्न होत असतील तर मी लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहे. मी भडकल गेटजवळ आंदोलन केले. तेथे नागरिकांचा पाठिंबा पाहून आनंद वाटला. माझ्यावर पोलिसांचा मोठा दबाव होता. आंदोलनात गोंधळ होईल. तुमच्यावर त्याचे आरोप होतील. काही मुलांचा जोश पाहायला मिळत आहे. मात्र, त्यामुळे आपण उद्देशापासून दूर जाणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे.
आंदोलन संपवण्याचे प्रयत्न : इम्तियाज म्हणाले की, हे आंदोलन कमकुवत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोर्चा काढल्यानंतर केस दाखल करण्यात आली आहे. आम्ही आता फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गेलो, तर गुन्हे दाखल झाले आहेत. आपल्या शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची कमतरता नाही. आता आम्ही शहागंजमध्ये महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत मार्च काढणार. काही लोक म्हणतात, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करीत नाही. आम्ही आता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडेही जाणार आहोत. आमच्यावर दबाव टाकून आंदोलन संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
इम्तियाज यांच्यासह प्रमुख २८ जणांवर गुन्हे दाखल औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह विविध संघटनांनी नामांतराविरोधात भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. त्यातच गुरुवारी सायंकाळी औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेटदरम्यान कँडल मार्च काढण्यात आला. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारूनदेखील हा मार्च काढल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २८ पदाधिकारी व दीड हजार कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २४ फेब्रुवारी रोजी राज्य व केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर केले. ते रद्द करून औरंगाबाद नाव कायम ठेवण्यासाठी शहरात आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.