आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबजाजनगरातील कॉम्प्युटर क्लास पूर्ण करून बुधवारी, १२ एप्रिलला रिक्षाने रांजणगावला जाण्यासाठी निघालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकास नागरिकांनी पकडून चोप दिला. नंतर या रिक्षाचालकाच्या दोन्ही मुलींनी विनवणी केल्यानंतर १७ वर्षीय मुलगी व तिच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार न देण्याचा निर्णय घेतला.
औद्योगिक परिसरातील एक लघु उद्योजक रांजणगाव परिसरात राहतात. त्यांची १७ वर्षीय मुलगी कॉम्प्युटर क्लाससाठी सकाळी बजाजनगरला जाते. वडील दुचाकीने तिला सोडतात. क्लासनंतर ती रिक्षाने घरी परतते. बुधवारी क्लास सुटल्यानंतर मुलगी बजाजनगर येथून सकाळी १० वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी स्टरलाइट कंपनीसमोर पायी आली. तेथून ती रांजणगाव फाटा येथे उतरायचे आहे असे सांगून एका रिक्षात बसली. रिक्षा रांजणगाव फाट्यावर आल्यानंतर ‘काका, रिक्षा थांबवा’ असे तिने चालकाला सांगितले. मात्र, तो एनआरबी चौकाच्या दिशेने रिक्षा घेऊन निघाला. रिक्षा उभी न केल्याने तसेच रिक्षाच्या दोन्ही बाजूंनी पुठ्ठा लावलेला असल्याने घाबरलेल्या मुलीने रिक्षा थांबवण्याची विनंती वारंवार केली. मात्र चालकाने रिक्षा जोगेश्वरीच्या दिशेने नेली. मुलगी जास्तच मोठमोठ्याने आरडाओरड करत असतानाच त्याने पुन्हा रिक्षा जोगेश्वरी मार्गाहून एनआरबी चौकाच्या दिशेने वळवली.
पोलिसांनी नोंदवला मुलीचा जबाब : पोलिसांनी मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. मात्र, ५५ वर्षीय रिक्षाचालकाच्या विवाहित व अन्य एक अशा दोन्ही मुलींनी पोलिसांत तत्काळ धाव घेत आपल्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करू नये अशी मुलीसह तिच्या वडिलांकडे विनवणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वडिलांना बघून फोडला टाहो, वडिलांनी चालकाला खाली उतरवले याचदरम्यान मुलीचे वडील ऋचा कंपनी परिसरातील एका शॉपवर कंपनीतील साहित्याची खरेदी करण्यासाठी आले होते. वडिलांना पाहताच मुलीने ‘पप्पा, मला वाचवा’ असा जोरात टाहो फोडला. मुलीच्या आवाजाच्या दिशेने बघून वडिलांनी तत्काळ रिक्षाच्या पुढे दुचाकी उभी केली आणि चालकाला रिक्षातून खाली उतरवत जाब विचारला. पकडलेल्या रिक्षाचालकाने हिसका देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नागरिकांनी पकडून त्याला चोप दिला. मात्र, रिक्षाचालक संधी साधून घटनास्थळी रिक्षा सोडून पसार झाला. पुढे त्याने पोलिसांत धाव घेत मला नागरिकांनी मारले आहे, असे सांगितले. पोलिसांनी त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.