आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 हजार मालमत्तांना फायदा:सिडकोतील नागरिकांना मिळेल टीडीआरचा लाभ ; बहुमजली इमारती होणार आता नियमित

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील फ्री होल्डचा विषय अद्याप अधांतरी आहे. मात्र, आता सिडकोतील रहिवाशांना शहरातील कुठल्याही भागातील टीडीआर विकत घेता येऊ शकेल, असा आदेश मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी काढला आहे. ३० ऑक्टोबरपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सिडकोतील अनेक बहुमजली इमारती आता नियमित होतील. ५० हजार मालमत्तांना याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मिळेल. सिडकोत जवळपास पन्नास हजार मालमत्ता आहेत. या वसाहतीचे नियोजन सिडकोने केले असून त्याची मालकीदेखील त्यांच्याकडेच आहे. मात्र १ एप्रिल २००६ पासून या भागाचे नियोजन प्राधिकरण म्हणून महानगरपालिकेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यानुसार मनपाने हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हा नियम सिडकोतील मालमत्तांसाठी लागू नव्हता. आता कुठल्याही भागातील टीडीआर सिडकोतील मालमत्ताधारकांना घेता येऊ शकतो. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सिडको क्षेत्रासाठी विकास हक्क प्रमाणपत्र नियमावली लागू करण्यास मान्यता दिली आहे.

टीडीआर म्हणजे काय : सर्वसाधारण भाषेत हवेतील जागा विकत घेणे म्हणजे टीडीआर विकत घेणे. टीडीआर (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स) ज्याला मराठीत उडते चटई क्षेत्र म्हणतात. शासन अनेकदा रस्ता रुंदीकरण, बागबगिचे, मैदाने अशा सुविधांसाठी जागा संपादित करते किंवा आरक्षण जाहीर करते. या जागा शासनास दिल्यावर किंवा इतर कारणासाठी जागा संपादित झाल्यास त्याचा मोबदला रोख किंवा टीडीआरच्या स्वरूपात देण्यात येतो. ते डीसीआर (डेव्हलपमेंट राइट सर्टिफिकेट) स्वरूपात देण्याची पद्धत आहे. ज्या व्यक्तीस हे टीडीआर मिळतात ती व्यक्ती स्वत: त्याचा उपयोग करू शकते किंवा विकूदेखील शकते. टीडीआर विकत घेणे म्हणजेच टीडीआर लोड करणे होय. एखाद्या जमिनीवर टीडीआर लोड होऊ शकतो का, याबाबत स्थानिक नगररचना विभागाचे स्वतंत्र नियम आहेत.

तिजाेरीत जमा हाेतील २५ काेटी या निर्णयामुळे अनेक घरे नियमित होतील. त्यातून मनपाच्या तिजोरीत किमान २५ कोटी रुपये जमा होतील. शहरात ज्या लोकांकडे टीडीआर प्रमाणपत्र आहे, त्यांच्याशी संपर्क करुन मालमत्ताधारकांना आहे त्या दराने ते विकत घेता येते. त्याची नोंद मनपाकडे करावी लागते. त्यासाठी किरकोळ शुल्क आहे. यामुळे परवानगी नसताना वाढवलेले मजले नियमित होऊ शकतात.

बांधकाम व्यावसायिकांनासुद्धा होणार फायदा मनपाने टीडीआरबाबत घेतलेला हा निर्णय चांगला आहे. याचा बांधकाम व्यावसायिकांनासुद्धा फायदा होणार आहे. आतापर्यंत संपूर्ण शहरासाठी एक नियम आणि सिडकोसाठी वेगळा नियम लागू होता. सिडकोतील रहिवाशांना शहरातील कुठल्याही भागाचा टीडीआर विकत घेता येणार आहे. गुलमंडीसारख्या भागातला रेडीरेकनर दर जास्त आहे. सिडकोत मात्र त्या तुलनेने कमी आहे. मात्र घेणाऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून टीडीआर विकत घेण्यासाठी जेवढे पैसे घेतले तेवढा एफएसआय वापरता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...