आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:शहरातील रस्ते बनले अनधिकृत बाजार; पोलिस अन् महापालिकेने साधली चुप्पी

संतोष देशमुख | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील छावणी, शहानूरमियाँ दर्गा, चिकलठाणा आणि जुना मोंढा परिसरातील मुख्य रस्ते, चौकात फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. प्रमुख रस्ते व चौकात लांबच लांब बाजार भरतो. मुख्य मार्गावर हातगाड्या, फळभाज्यांची वाहने उभी राहतात. चौकाचौकात पोलिस असतात. त्यांच्यासमोरच बाजार भरतो. याच रस्त्याने पोलिस, मनपा न्याय विभागातील अधिकारी, दंडाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन केंद्रीय, राज्याचे तीन मंत्री, विरोधी पक्षनेते ये-जा करतात. मात्र, ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. यामुळे वाहतूक ठप्प होते. रुग्णवाहिकेला जाण्यासाठी लवकर वाट मिळत नाही.

प्रमुख व अंतर्गत रस्त्यावर भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, वस्तू व सेवा विक्री करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. कारवाई होत नसल्याने चारपदरी रस्ता दोनपदरीच होतो. सिडको बसस्थानक ते जालना रोडवर ५० पेक्षा अधिक हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री होते. कामगार चौक, जय भवानी चौक, पुंडलिकनगर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते गजानन महाराज मंदिराच्या अर्धा किमी रस्त्यावरच बाजार भरतो.

सेव्हन हिल्स, सूतगिरणी चौक, शिवाजीनगर ते रेल्वे पटरी, पटरी ते देवळाई चौक, दर्गा चौक ते सिग्मा, पुढे जालना रोड, चेतक घोडा ते गजानन महाराज चौक, त्रिमूर्ती चौक, चिकलठाणा ते नगर नाका, पंढरपूर तिरंगा चौक, बजाजनगर मोहटादेवी चौक, जय भवानी चौक, मच्छी मार्केट, रांजणगाव शेणपुंजीचा मुख्य रस्ता, कमळापूर, पडेगाव, मध्यवर्ती बसस्थानकासमोर व परिसरात पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अलीकडेच, मंदिर परिसर, टीव्ही सेंटर चौक ते जळगाव रोड उत्तर व पूर्व, दोन्ही बाजूला, जटवाडा रोड, शहागंज, औरंगपुरा, निराला बाजार, पैठण गेट, क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन, केव्हीके, कांचनवाडी, भाजीबाई चौक, जळगाव रोडवर बाजार भरताे.

मनपा अतिक्रमण विभागप्रमुख रवींद्र निकम यांना थेट प्रश्न

रस्त्यावर बाजार भरताे. मनपा अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही?
उत्तर : गत दोन वर्षांत १०० वेळा रस्त्यावरील बाजारांवर कारवाई केली. मात्र, बेरोजगारांच्या हाताला काम व लोकांची गरज या माध्यमातून पूर्ण होत असल्याने रस्त्यावर भाजीपाला, फळे, आदी विक्रीला खतपाणी मिळते.

प्र. रस्त्यावर अशा प्रकारे बाजार भरणे योग्य आहे काॽ
उत्तर : अजिबात नाही. आम्ही सतत कारवाई करतो. नुकतेच सिडको कॅनॉट रस्ता ते जलकुंभाजवळील रस्त्यावरील फळ बाजार हटवला. इतर सर्व ठिकाणचे बाजार हटवून रस्ते मोकळे केले जातील.

प्र. कायद्यात काय तरतूद आहे. त्याचे पालन होते काॽ
उत्तर : महाराष्ट्र मनपा अधिनियम कलम २३१ नुसार विनासूचना, विनानोटीस रस्त्यावरील अतिक्रमण काढता येते. एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे. त्यानुसार कारवाई केली. मात्र, एकूण दंड किती आकारला हे सांगता येणार नाही.

प्र. रस्त्यावरील बाजारासाठी मनपा स्वतंत्र जागा का देत नाहीॽ
उत्तर : हातगाड्या, पाल मांडून व्यवसाय, भाजीपाला व फळांचा बाजार, कपडे, चप्पला आदी वस्तू व सेवा विक्रेत्यांचे हॉकर्स झोन कुठे असायला हवेत, याबाबत नियोजन सुरू आहे. समिती गठित केली आहे. लवकरच निर्णय घेऊ.

मोटार वाहन कायदा काय म्हणतोॽ
भाजीपाला, विविध वस्तू खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहन उभे करतात. त्यामुळे पायी चालणे कठीण हाेते. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १७७ नुसार रस्त्यावरील पार्किंग, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन, व्यक्तीविरोधात ५०० रुपये आणि १८४ नुसार २ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मात्र, सर्व रस्त्यांवरील बाजारावर मनपा अतिक्रमण विभाग व पोलिस, आरटीओ प्रशासन संयुक्त कारवाई करत नसल्याने बेकायदेशीर बाजार, वाहन पार्किंगची समस्या गंभीर होत चालली आहे.

बातम्या आणखी आहेत...