आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:कमल तलाव तातडीने स्वच्छ करा, अतिक्रमणेही काढावीत; मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचे आदेश

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमखास मैदानाच्या बाजूला असलेल्या ऐतिहासिक कमल तलावाची महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी पाहणी केली. तसेच तेथील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश दिले. यापुढे तलावात अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी आरेफ कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जाणार असल्याचेही पांडेय यांनी स्पष्ट केले.

चार वर्षांपूर्वी जिल्हा सनियंत्रण समितीने या तलावाच्या सौंदर्यकरणासाठी ९० लाख रुपये दिले होते. या निधीतून तलावाचे संवर्धन, तसेच सौदर्यीकरण करण्याचे ठरले होते. मात्र मध्येच या कामाला ब्रेक लागला. दरम्यान, २०१८ मध्ये शहरातील कचरा नारेगाव येथे टाकण्यास बंदी केल्यानंतर या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कचरा टाकण्यासाठी कमळ तलावाचा वापर केला. या ठिकाणी रात्रीच्या वेळी कचरा आणून टाकला गेला. तसेच चर खोदून त्यात कचरा टाकला. त्यानंतर कमल तलावाची आजवर स्वच्छता करण्यात आलेली नाही. पुढे कचरा प्रकल्पांमुळे कचरा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर या तलावाचे संवर्धन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनासह महापालिकेची देखील होती. मात्र त्याकडे आजवर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

अतिक्रमणे तत्काळ काढण्याचे आदेश
पाहणी केल्यानंतर काही नागरिकांनी तलावात अतिक्रमणे केली असल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर पत्र्याचे शेड, गोठे आणि पक्की घरे बांधून बेकायदेशीर ताबा केला असल्याचेही निदर्शनास आले. त्यावर पूर्ण तलाव परिसराची मार्किंग करून अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश प्रशासकांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपायुक्त अपर्णा थेटे, उपसंचालक नगररचना ए.बी. देशमुख, कार्यकारी अभियंता भागवत, फड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...