आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण:हवामान बदलाचा राज्यातील 30 जिल्ह्यांना गंभीर धोका; महाराष्ट्र पूर, चक्रीवादळ, दुष्काळाच्या उंबरठ्यावर

औरंगाबाद / महेश जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हवामान बदल आणि तापमान वाढीचे संकट आपल्या दारापर्यंत पोहोचले असून महाराष्ट्रातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांवर पूर, चक्रीवादळ आणि दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. राज्यातील ८० टक्के लोकसंख्येसमोर पर्यावरणीय संकटाने तगडे आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्रासह पाच राज्य वगळता अन्य राज्यांकडे या संकटांचा सामना करणारी पुरेशी यंत्रणाही नाही.

संयुक्त राष्ट्राची २६ वी हवामान बदल परिषद (सीओपी-२६) स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू झाली. हरितगृह वायु उत्सर्जनामुळे तापमान वाढ आणि पर्यायाने हवामान बदलाचा धोका वाढत आहे. त्यावर परिषदेत मंथन सुरू होण्याआधीच दिल्लीच्या "कौन्सिल अॉन एनर्जी, एन्वारन्मेंट अॅण्ड वॉटर' (सीईईडब्ल्यु) या संस्थेने २७ राज्यांचा "क्लायमेट व्हल्नरेबिलीटी इंडेक्स' जाहीर केला. त्यानुसार देशातील ६४० पैकी ४६४ जिल्ह्यांना हवामान बदलाचा धोका आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि आसामसमोर मोठे संकट आहे.

बदलाचे २००५ पासून परिणाम
हवामान बदलाचे दृश्य परिणाम २००५ पासून जाणवण्यास सुरुवात झाली. २०२१ पर्यंत यात २०० पटीने वाढ झाली आहे. कोरडा व ओला दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, शीतलहर, पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल असे प्रकार घडताहेत. संकटांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक आणि गुजरात वगळता एकाही राज्याने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात काळानुरूप सुधारणा केलेली नाही.

सांगलीला दुष्काळाचे आव्हान
हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या देशातील ६ जिल्ह्यांमध्ये सांगलीसह धेमजी व नागाव (आसाम), खम्मम (तेलंगण), गजपती (ओडिशा),चेन्नई ( तामिळनाडू ), विजीआंग्रम (आंध्र प्रदेश) यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये सांगली-कोल्हापुरात आलेला महापूर त्याचेच एक प्रतीक होते. भविष्यात सांगलीला राज्यातील सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागेल, असे हा अहवाल सांगतो.

धोका २०० पटीने वाढलाय
गेल्या १५ वर्षात हवामान बदलाचा धोका २०० पटीने वाढला आहे. देशातील ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या याला तोंड देत आहे. दुर्दैवाने सरकारकडे अजून त्याचा सामना करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी क्लायमेट रिस्क कमिशन तयार करणे गरजेचे आहे. अबिनाश मोहंती, प्रोग्रॅम लीड, सीईईडब्ल्यू

राज्यातील नऊ जिल्ह्यांना गंभीर धोका
हवामान बदलाचे परिणाम म्हणून पूर, चक्रीवादळ आणि दुष्काळ यांच्या तीव्रतेनुसार शहरांचे पाच श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. यानुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

अत्यंत असुरक्षित : *सांगली *नगर *सोलापूर *धुळे *मंुबई *मंुबई उपनगरे *बुलडाणा *हिंगोली *जळगाव

असुरक्षित *उस्मानाबाद *नागपूर *सातारा *अकोला *नांदेड *बीड *औरंगाबाद *परभणी *नंदुरबार *सिंधुदुर्ग

मध्यम असुरक्षित *नाशिक *जालना *पुणे *गडचिरोली *रत्नागिरी *वाशिम *रायगड *गोंदिया *चंद्रपूर *लातूर *अमरावती

कमी सुरक्षित : *वर्धा *यवतमाळ *ठाणे *पालघर

सामान्य : *भंडारा *कोल्हापूर

बातम्या आणखी आहेत...