आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर लॉकडाऊनमध्ये बंद असलेली मंदिरे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. भाविकांच्या दृष्टीने हा स्तुत्य निर्णय आहे. या सोबतच सरकारने राज्यातील ऐतिहासिक आणि पवित्र दुर्लक्षित मंदिरांच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे. नांदेड जिल्ह्यातील राहेरचे प्रसिद्ध नृसिंह मंदिर गेल्या कित्येक शतकापासून दुर्लक्षित आहे.
नृसिंह क्षेत्राशिवाय शैव आणि महानुभावांचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील राहेर ता. नायगाव बाजार येथील १३ व्या शतकातील नृसिंह मंदिर व राहेरच्या अलौकिक बाबी जपण्यासाठी विकासाची पावले उचलण्याची गरज आहे़. या मंदिराकडेकडे खऱ्या अर्थाने पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. राहेर गावाच्या पुनर्वसनामुळे या मंदिराचे वैभव हरवले आहे़. १३ शतकातील यादवकालीन दगडी शिल्पकला असलेले नृसिंह मंदिर गोदावरी नदीकाठापासून ४ कि.मी. अंतरावर आहे़. गावाच्या पुनर्वसनामुळे हे मंदिर एकाकी पडले आहे़. राहेरचे नृसिंह मंदिर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने पुरातत्त्व विभागाच्या निकषावर मंदिराच्या जीर्णोद्धारासह परिसर विकास होणे गरजेचे आहे.
समितीचे विश्वस्त आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राहेर नृसिंह मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्व खात्याने पुरातत्व खात्याच्या निकषांवर आधारितच केला पाहिजे हे इतिहास संशोधकांचे मत आहे. या पवित्र ठिकाणी गोदाकाठी संत बाळगीर महाराज, मायदेव प्रभू, चक्रधर स्वामी, दासगणू महाराज आदींचे वास्तव्य राहिले आहे. ध्यानधारणेसाठी ही जागा पवित्र व रमणीय आहे. या ठिकाणी संतांनी व महात्म्यांनी इशप्राप्तीसाठी प्रयत्न केले. या जागेचे पावित्र्य जपल्याने ती वंदनीय झाली. नदीकाठच्या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत गोदाकाठी नाशिक, पैठण, गंगाखेड, नांदेड, राहेर, संगम, कंदकुर्ती, बासर या ठिकाणी संत-महात्म्यांनी संस्कृती संवर्धनासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे़.
तीर्थक्षेत्र राहेर सर्व देवांचे माहेरघर म्हणून परिचित आहे़. राहेरला तीर्थक्षेत्र घडवण्यासाठी संत महात्म्यांनी ईश्वराची पालखी आणली, असे म्हटले जाते. महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचे दीर्घकाळ वास्तव्य व त्यांच्या कार्यकाळातील योगदान महत्त्वाचे मानले जाते.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना : राहेरचे मंदिर केवळ पवित्र तीर्थक्षेत्रच नाही, तर हेमाडपंती वास्तुशिल्प कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. राहेर गावाचे पुनर्वसन झाल्याने हे ऐतिहासिक मंदिर एकाकी पडले आहे. अशा परिस्थितीत या ऐतिहासिक, पुरातन मंदिराची शिल्पकला नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करून पुरातन वास्तुकलेचा वारसा जतन करावा, अशी इतिहासप्रेमी नागरिकांची मागणी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.