आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत येथील मोंढा बाजाराच्या विस्तारीकरणासाठी 13 हेक्टर गायरान जमीन बाजार समितीला देण्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे या भागातील हळद व केळी उत्पादक शेतकऱ्यांची बीटसाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. वसमत तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यास येलदरी, इसापूर, सिध्देश्वर धरणातील पाण्याचा लाभ होते. त्यामुळे ऊस, केळी, हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. या भागात असलेल्या कारखान्यांना ऊस दिला जातो. तर हळदीचे बाजार समितीच्या यार्डातच बीट होते. या ठिकाणचे हळदीचा बाजार प्रसिध्द असल्याने मराठवाड्यासह राज्यातील हळद विक्रेते तसेच खरेदीदार या ठिकाणी येतात.
मात्र केळीच्या बीटसाठी स्वतंत्र जागा नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. या सोबतच सोयाबीन, ज्वारी, उडीद, मुग, गहू, तुर देखील या ठिकाणी विक्रीसाठी येते. मात्र सध्याची मोंढा बाजाराची जागा केवळ 12 हेक्टर आहे. अपुऱ्या जागेमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून अनेक वेळा किरकोळ कारणावरून वादाचे प्रकारही होतात. त्यामुळे वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील 13 हेक्टर गायरान जमीन बाजार समितीला विस्तारीकरणासाठी हस्तांतरीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुंबई येथे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, वसमतचे शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके पाटील, बाजार समितीचे सभापती राजेश इंगोले पाटील यांनी भेट घेतली. दरम्यान, यावेळी त्यांनी मोंढ्यातील अडचणी मांडल्या. या जागेसाठी यापुर्वीही पाठपुरावा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सदर जागा देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राजू चापके पाटील यांनी सांगितले. सदर जागा हस्तांतरीत झाल्यास या ठिकाणी स्वतंत्र बाजाराची उभारणी करण्याचे बाजार समितीचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची गैरसोय दुर होणार
या जागेवर 2 हेक्टरवर कापूस बाजार, 2 हेक्टरवर भुसार, 1 हेक्टरवर केळी व भाजापीला विक्री केंद्र, 3 हेक्टर जागेवर जनावरे खरेदी अन विक्री, एक हेक्टर जागेवर गोदाम तर एक हेक्टरवर बाजार समितीचे कार्यालय उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.