आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच!:शिंदेंच्या दौऱ्याने सामान्यांना मनस्ताप; अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम, बसगाड्याही दुसऱ्या मार्गाने वळवल्या

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"माझ्या दौऱ्यादरम्यान सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही" अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मात्र, आज त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आहे. तर पैठण-औरंगाबाद मार्गावरील बसगाड्या देखील दुसऱ्या मार्गाने वळवण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे मात्र प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे तसेच शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाहनाअभावी हाल होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पैठण दौऱ्यावर असून त्यापार्श्वभूमीवर शिंदेंचे प्रत्येक गावोगावी भव्य असे स्वागत होणार आहे. त्यासाठी रोडच्या बाजूला भव्य अशी गर्दी जमा झाल्याचे पाहायला मिळतेय. ठिकठिकाणी भव्य अशा क्रेन आणि मोठमोठाले हार असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आहे.

बसगाड्या वळवल्या

पैठण-औरंगाबाद मार्गावरील बसगाड्या आज सकाळी 11 वाजल्यापासून बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठणला पोहोचल्यावरच हा मार्ग पुन्हा चालू करावा, असे फर्मान काढण्यात आले आहे. संतापजनक बाब म्हणजे दुप्पट अंतर व भाडे घेऊन पाचोड, चिकलठाणा मार्गे या बसगाड्या औरंगाबादला पाठवण्याचे आदेश आहेत. या फतव्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, वयोवृद्ध, दिव्यांग, छोटेमोठे व्यापारी व सामान्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

ढोल-ताशे सज्ज

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी संदीपान भुमरे यांच्या वतीने भव्य तयारी करणात आली. चितेगाव बिडकीन यासह पैठण रस्त्यावरील सर्व गावात स्वागताची तयारी करण्यात आली आहे. स्वतः भुमरे या ठिकाणी काही काळ थांबून पाहनी करत आहेत. स्वागतासाठी ढोल-ताशे देखील सज्ज करण्यात आले आहेत.

दीड क्विंटलचा हार

एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या प्रत्येक स्क्रीनवर दीड ते दोन क्विंटलचे मोठ-मोठाले हार लावण्यात आलेले आहेत. प्रत्येक गावात एक क्रेन असे चित्र पाहायला मिळत आहे.

रस्त्याच्या बाजूने क्रेन

शिंदे यांच्या स्वागतासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोकांची गर्दी देखील जमा झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे बारा वाजल्यापासूनच सर्वत्र ढोल वाजवणे सुरू झाले आहे. उंचच-उंच क्रेन आणि भव्य हार असे चित्र पैठण रस्त्यावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे ट्रॅफीक जाम झाली आहे. चितेगाव परिसरात अर्धा ते एक किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडकल्याची घटना घडली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांची दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना पाहणी करून ब्रिज तोडून काही काम करावे लागणार आहे, वाहतूक कोंडी आता लवकरच सुटेल. येथे काही समस्या आहेत. ज्या शंभर टक्के सुटणार, अशी ग्वाही शिंदेंनी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...