आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगल्यात मंदिर:32 वर्षांत एक हजाराहून अधिक गणपती मूर्तींचा संग्रह ;  न्या. चारुलता पटेल यांनी जोपासला अनाेखा छंद

औरंगाबाद / गिरीश काळेकर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिटमिटा परिसरात राहणाऱ्या निवृत्त न्या. चारुलता पटेल यांनी गणपती मूर्तींचा संग्रह करण्याचा अनाेखा छंद जाेपासला आहे. गेल्या ३२ वर्षांपासून गणपतीची विविध रूपे असलेल्या अर्धा, पाव इंचपासून ते दीड ते दोन फुटांच्या मूर्ती त्यांच्या घरात आहेत. पटेल यांनी आपल्या बंगल्याला दूर्वांकुर असे नाव दिले आहे. नावातच घरात काय असेल याची कल्पना येते. १९९० साली पटेल यांनी महाराष्ट्रातील १२१ गणपती बघितले. त्या ज्या ठिकाणी जात तेथून गणपती घेऊन येत. असे करत करत त्यांना गणपती संग्रहित करण्याची आवड निर्माण झाली. बघता बघता महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे त्यांनी पाहिली. सातारा, सांगली, दीव, दमण अशा विविध ठिकाणी नोकरीनिमित्त गेल्यानंतर सुटीत त्या आईसोबत गणपतीच्या दर्शनासाठी जात. यातून त्यांना विविध गणपती संग्रहित करण्याची ऊर्जा मिळत गेली.

बंगल्यात उभारले मंदिर : न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्या मिटमिटा येथे स्थायिक झाल्या. बंगल्यातही त्यांनी दूर्वांकुर नावाचे गणपतीचे मंदिर उभारले आहे. याच बंगल्यात त्यांच्याकडे लाकूड, कपड्याचे, काचेचे, टेराकोटा, तांबे, पितळाचे, स्फटिक, संगमरवरी, चांदी आणि पारा यापासून तयार केलेले पाव इंचपासून ते दोन फुटांपर्यंतचे १ हजाराहून अधिक गणपती आहेत. ढोलकी, हार्मोनियम, तबला, सनई, टाळ, बासरी वाद्य वाजवणारे लहान आकारातील गणपती तसेच हत्तीच्या रूपातील, डाळींचा, वामकुक्षी घेणारा, बैठ्या स्वरूपाचा, पेपर वाचणारा, शेतकरी, वारकऱ्याच्या रूपातील, अष्टविनायक यासोबतच बालगणेशाच्या रूपातील गणपती आहेत. ६० हजारांहून अधिक गणपतीचे पोस्टर्स, १ हजारांहून अधिक कीचेन, दीडशेहून अधिक कॅसेट, दोनशेहून अधिक गणपतीवरील पुस्तके, मासिके त्यांच्याकडे संग्रहित आहेत.

बातम्या आणखी आहेत...