आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रारी:जिल्हाधिकारी चव्हाण सतत अपमान करतात ; मंत्र्याच्या मध्यस्थीनंतरही अधिकारी तक्रारीवर ठाम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आमचा सतत अपमान करतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला. विशेष म्हणजे २० ते २५ कर्मचाऱ्यांनी फक्त तोंडी तक्रारी केल्या असून लेखी निवेदन मात्र दिलेले नाही.

गुरुवारी विमानतळावर पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या स्वागताला प्रोटोकॉलननुसार जे अधिकारी हजर नव्हते त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा काढल्या. शुक्रवारी काही भागांत गौणखनिज उत्खननाविरोधात कारवाई केली. यापाठोपाठ कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या. पण या घटनांचा व तक्रारींचा काहीही संबंध नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या तक्रारींनंतर एका मंत्र्याने मध्यस्थीसाठी विभागीय आयुक्तांना फोन केल्याचीही माहिती आहे. आयुक्तांनीही काहीही बोलण्यास नकार दिला. तर या विषयावर आपल्याला काहीच बाेलायचे नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

गुरुवारी भुमरेंच्या स्वागतास जिल्हाधिकारी चव्हाण, प्रोटोकॉल अधिकारी संगीता चव्हाण हजर होते. मात्र तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना त्याच दिवशी नोटिसा बजावून गैरहजर राहण्याचे कारण विचारले. शुक्रवारी गांधेली शिवारातील साई टेकडीसमोरील जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली ९ एकर ९ गुंठे डोंगर पोखरणाऱ्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून ३ हायवा एक पोकलेन एक ट्रॅक्टर जप्त केले. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, गौण खनिज अधिकारी किशोर घोडके यांचाही कारवाईत सहभाग होता.

सुट्या देत नाहीत, उगाच जास्त वेळ थांबवून घेतात
जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक न देता अपमान करतात. सुट्या न देणे, जास्त वेळ उगाच थांबवून घेतात, असे महसूल अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सांगितले. पण ही तक्रार फक्त तोंडी केलेली आहे, लेखी निवेदन दिलेले नाही. आयुक्तांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला.

बातम्या आणखी आहेत...