आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक क्रिकेट चषक स्पर्धा:कम्बाइन बँकर्स व श्रुती संघांचा विजय; शशिकांत पवार, योगेश चौधरी ठरले सामनावीर

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हेरॉकतर्फे आयोजित औद्योगिक टी-20 क्रिकेट स्पर्धेत कंम्बाइन बँकर्स व श्रुती संघांनी विजय मिळवला. एडीसीए मैदानावर झालेल्या सामन्यात कम्बाइनने महावितरण संघावर 22 धावांनी विजय मिळवला. युवा खेळाडू शशिकांत पवार व योगेश चौधरी हे दोन्ही स्पर्धेक सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

प्रथम फलंदाजी करताना बँकर्सने 20 षटकांत 5 बाद 143 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर इनायत अली सय्यद 6 व हरमिंदरसिंग पलाया 11 आल्यापावली परतले. शशिकांत पवारने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने 49 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 3 षटकार खेचत 62 धावा ठोकल्या. कुणाल पालखने 10, हरमितसिंग रागीने 20, कर्णधार श्याम लहानेने 11 धावा काढल्या. महावितरणकडून संजय बनकरने 12 धावांत 2 बळी घेतले. पांडूरंग धांडे, स्वप्निल चव्हाण व राम राठोडे प्रत्येकी एकाला टिपले.

प्रत्युत्तरात, महावितरण संघ निर्धारित षटकांत 8 बाद 121 धावा काढू शकला. यात राहुल शर्माने 35 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह सर्वाधिक 37 धावा काढल्या. स्वप्निल चव्हाणने 22, महेश मुलेकरने 11, पांडूरंग धांडेने 11 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. बँकर्सकडून इम्रान लिफ्तीने 24 धावांत 3 बळी घेतले. इनायत अलीने 2 व व्यंकटेश्वर चव्हाणने एकाला टिपले.

योगेश चौधरीचे शानदार शतक

दुसऱ्या लढतीत श्रृती संघाने डिएगो एक्स वन संघावर 190 धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम खेळताना श्रृती संघाने 20 षटकांत 6 बाद 255 धावांचा डोंगर उभारला. यात सलामीवीर अभिषेकने 24 व अशोक शिंदेने 20 धावा केल्या. योगेश चौधरीने तुफान फटकेबाजी करत शानदार शतक झळकावले. त्याने 36 चेंडूंचा सामना करताना 21 सणसणीत चौकार व 5 उत्तुंग षटकार खेचत 139 धावा ठोकल्या. सचिन हातोळेने 10, ऋषिकेश नायरने 10 व इशांत रायने 15 धावा जोडल्या. डिएगोने सौरभ शिंदेने 37 धावांत 3 गडी बाद केले. हर्षवर्धन काळे, सागर तोंडेने 1-1 गडी टिपला.

प्रत्युत्तरात डिएगोचा डाव 16.1 षटकांत अवघ्या 65 धावांवर संपुष्टात आला. यात नितिन साळवेने 19 धावा काढल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या काढता आली नाही. श्रृतीकडून ऋषिकेश नायर 3 आणि योगेश चौधरी, भगवान नरवडे, इशांत रायने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...