आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळातील प्रश्न:आ. प्रशांत बंब यांच्याशी अरेरावी करणाऱ्या शिक्षक पत्नीविरोधात गुन्हा दाखल

लासूर स्टेशन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांना फोनवर जाब विचारून अर्वाच्य भाषा वापरत धमकी दिल्याप्रकरणी शुक्रवारी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात रात्री एका शिक्षक पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पीआय मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली.

शिक्षकांसह विविध सरकारी कर्मचाऱ्यांनी नियुक्ती मिळालेल्या गावातच म्हणजे मुख्यालयीच राहावे, यासाठी विधानसभेत आमदार प्रशांत बंब यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आमदार प्रशांत बंब यांना फोन करून शिक्षकांकडून थेट धमकावल्याची क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे आमदार बंब यांनी मी अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील विविध पोलिस ठाण्यांत शिक्षक पत्नीविरोधात अर्वाच्य भाषा वापरून धमकावल्याबद्दल आ.बंब समर्थकांनी ठाणेप्रमुखांकडे गुन्हे नोंदवण्यासंदर्भात निवेदने दिली आहेत. एवढेच नाही तर काही पालकांनी आता मेळावे घेण्याचे ठरवले असून यामुळे आता शिक्षकांची एका प्रकारे पंचाईतच होणार असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातील विविध शिक्षक फोन करून यासंदर्भात आ. बंब यांना जाब विचारत असून, काल एका शिक्षकाच्या पत्नीने आ. बंब यांना फोन करून अरेरावी केली. हे प्रकरण जोरदार तापले असून या महिलेविरोधात शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आ. बंब यांच्या वक्तव्यावर शिक्षकांचा रोष : बंब यांच्या विधिमंडळातील वक्तव्यानंतर राज्यभरातील शिक्षकांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. काही शिक्षकांनी तर या अनुषंगाने आ. बंब यांना फोन करून जाबही विचारला होता. एका शिक्षक पत्नीने फोन करून आ. बंब यांना अरेरावी करीत अर्वाच्य भाषेत संवाद साधला. सुमारे ३४ मिनिटांच्या या संवादात या महिलेने आ. बंब यांना अनेक ठिकाणी अरे-कारे अशी भाषा वापरली. विशेष म्हणजे आ. बंब यांना जाब विचारणाऱ्या या महिलेने या संवादात बहुतांश वेळा त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही.

बंब यांनी मांडला होता खोट्या घरभाडे बिलाचा मुद्दा
मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांसह ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियुक्ती मिळालेल्या गावाच्या मुख्यालयीच राहणे अत्यावश्यक आहे, असा आग्रह आ. बंब यांनी विधिमंडळात धरला होता. या वेळी त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना विविध दाखले दिले होते. अनेक शिक्षक, शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता खोटी घरभाडे बिले सादर करून फसवणूक करीत असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.

बातम्या आणखी आहेत...