आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूकदारांना 30 काेटींचा गंडा:कमोडिटी ट्रेडिंगच्या नावाखाली 700 जणांना 30 कोटींचा गंडा, औरंगाबादसह जालना, नाशिक, जळगावकरांची फसवणूक

औरंगाबाद (मंदार जोशी)21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विश्वास बसावा म्हणून अाधी एक वर्ष दर महिन्याला 15 टक्क्यांनी दिला परतावा, 3 वर्षांनंतर पोबारा

कमोडिटी ट्रेडिंगच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातील एका भामट्याने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील ५०० ते ७०० लोकांना सुमारे ३० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे.

दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून त्याने औरंगाबादसह पुणे, जालना, जळगाव, नाशिक व राज्यातील अनेक जिल्ह्यांतील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारी पाेलिसांकडे येत अाहेत. अक्षय उत्तम भुजबळ (२७) असे या भामट्याचे नाव असून तीन महिन्यांपूर्वी त्याच्याविराेधात अाैरंगाबाद पाेलिस अायुक्तांकडे तक्रारी दाखल झाल्या अाहेत, मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. विशेष म्हणजे अक्षयवर यापूर्वी पुण्यातही असाच फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला अाहे. सन २०१७ मध्ये अक्षय भुजबळने अाैरंगाबादेतील सिडको एन-२ भागात एस.एस.जे कमोडिटी या नावाने कार्यालय उघडले. नंतर २०१९ मध्ये प्रोझोन माॅलजवळील गोल्डन सिटीत जेजीएमएम कमोडिटीज या नावाने दुसरे कार्यालय सुरू केले. या तीन वर्षांत एजंटचे जाळे तयार केले. चांगले ग्राहक आणणाऱ्या एजंटांना चारचाकी, थायलंड-मलेशिया टूर अशी बक्षिसेही दिली.

१ लाखावर १५ हजार व्याज, ११ महिने दिला परतावा
११ महिने एक लाख रुपये गुंतवा अाणि महिना १५ हजार रुपये मिळवा आणि ११ महिन्यांनंतर मुद्दल १ लाख रुपये परत मिळवा, असे अामिष अक्षयने दाखवले. लोकांनी पैसे गुंतवल्यानंतर त्याने काही जणांना ११ महिने परतावा दिला. आलेल्या पैशातून लोकांनी गाड्या घेतल्या, घराचे बांधकाम केले. त्यामुळे औरंगाबादसह इतर शहरांतील लाेकांनीही अक्षयकडे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. अगदी मुलीचे लग्न, घर बांधण्यासाठी ठेवलेले पैसेदेखील गुंतवले. ग्राहक आणणाऱ्या लोकांना पाच टक्के कमिशन दिले.

बड्या हाॅटेल्समध्ये सेमिनार, जेवणावळी
शहराजवळील मोठे हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये सेमिनार घेतले, भोजनावळी दिल्या. अनेकांना डाऊन पेमेंट भरून चारचाकी गाड्या घेऊन दिल्या. त्याचे हप्तेही भरले. विश्वास बसल्याने मग शहर व जिल्ह्याबाहेरील अनेकांनी अक्षय आणि त्याच्या साथीदारांकडे अगदी ५० हजार रुपयांपासून ७५ लाखांपर्यंत गुंतवणूक केली. अालिशान गाड्या, कार्यालये पाहून काही पोलिस, वकील आणि न्यायाधीशांच्या चालकाने पैसे गुंतवले आहेत.

काय करायचे ते करा, गुंतवणूकदारांनाच धमक्या
दोन वर्षांत औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे, नाशिक या भागातील सुमारे ३० काेटींची गुंतवणूक अक्षयने घेतल्याची प्राथमिक माहिती अाहे. नंतर मात्र त्याने या लाेकांशी संपर्क ताेडला. शेअर मार्केट डाऊन आहे, गुजरातच्या एका कंपनीकडे पैसे अडकले आहेत, अशी कारणे देत ताे परतावा देण्यास टाळाटाळ करू लागला. २०२० मध्ये तो मोजक्याच लोकांच्या संपर्कात हाेता. याच वेळी काहींनी अाम्ही पाेलिसांत जाऊ असे धमकावले. तेव्हा ‘तुम्हाला जायचे तर जा, पण मग पैसे मिळणार नाहीत,’ अशी उलट धमकी दिली. आता तर तुम्हाला काय करायचे ते करा, माझे कोणी वाकडे करू शकत नाही, असे तो लोकांना सांगतो.

माेडिटी ट्रेडिंगच्या नावाखाली पुणे जिल्ह्यातील अक्षय उत्तम भुजबळ या २७ वर्षीय भामट्याने मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक गुंतवणूकदारांना सुमारे ३० काेटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. कमी मुदतीत जास्त पैसे मिळत असल्याच्या अामिषाला बळी पडून अनेकांनी मुलीच्या लग्नासाठी, घर बांधकामासाठी साठवून ठेवलेले लाखाे रुपये अक्षयकडे गुंतवले अन‌् या भामट्याने ही रक्कम हडप करून पाेबारा केला. अाता लाखाे रुपये बुडाल्याची खात्री पटल्यानंतर गुंतवणूकदार पाेलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत अाहेत.

दरम्यान, अक्षयने कंपनी सुरू करून फसवणूक केल्याचा अर्ज आमच्याकडे आला आहे. मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या नियमाप्रमाणे संपूर्ण चौकशी करूनच गुन्हा दाखल करतो. या प्रकरणातही लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल, असे अार्थिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले.

२०१५ मध्ये अशाच फसवणुकीच्या प्रकारात पुण्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात अक्षय भुजबळ, मंगल भुजबळ, विजय रामभाऊ वाडघुले आणि देविदास भाऊसाहेब करपे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. यापूर्वी त्याने २०११-१२ साडेचार कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. यात नितीन राजाराम नरके हा प्रमुख आरोपी होता तर अक्षय सहआरोपी होता. पुण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर तो तेथून फरार झाला आणि औरंगाबादला गाेरखधंदा सुरू केला. औरंगाबादकरांनीही लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची काहीही चौकशी केली नाही. त्यामुळेच त्यांची फसवणूक झाली.

९ लाखांचे चेकही दिले
माझ्या मुलीच्या लग्नासाठी केलेली एफडी मोडून साडेचार लाख रुपये गुंतवले होते. आता तिच्या लग्नाचा खर्च कसा करावा, असा प्रश्न आहे. गुंतवलेल्या रकमेची गॅरंटी म्हणून मला नऊ लाख रुपयांचे २० चेक दिले आहेत. हे पुरावेदेखील आम्ही पोलिसांकडे सादर करण्यास तयार आहोत. - भाऊसाहेब रायभान गावंडे, तक्रारदार

फसवणूक झालेल्या ठेवीदारांच्या तक्रारी
आम्हाला न्याय मिळावा

कमोडिटी ट्रेडिंग कंपनी दाखवल्यामुळे आम्ही अक्षयवर विश्वास ठेवला. मात्र आमची फसवणूक झाली. आमची मानसिक व आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कमकुवत झाली अाहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करावा. - विवेक साळुंके पाटील, तक्रारदार

मी २०१८ मध्ये गुंतवणूक केली होती. काही दिवस त्याने वेळेवर पैसे दिले. त्यामुळे आम्ही अजून गुंतवणूक केली. माझे ३५ लाख रुपये भुजबळने आज देतो, उद्या देतो अशी थाप मारत एक रुपयादेखील दिला नाही. पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. - सुनील किशोर फटाले, तक्रारदार

ऑक्टोबर २०२० मध्ये फसवणूक झालेल्यांनी अाैरंगाबाद पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज दिला. मात्र तीन महिन्यांनीही गुन्हा दाखल झाला नाही. फसवणूक झालेले विवेक यशवंत पाटील यांच्यासह इतरांना आमच्याकडे अजून अर्जच आला नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात अाले. त्यांनी आयुक्तांचीही भेट घेतली.

सेवेकरी असल्याचा दावा
मी स्वामी समर्थांचा सेवेकरी असल्याचे सांगून भामटा अक्षय गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करायचा. कधीही चुकीचे काम करणार नाही, असे सांगत हाेता. कुणी शंका घेतली तर मी स्वामींची शपथ घेतो असे म्हणत असे. त्यामुळे अनेकांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याच्या या ढोंगीपणामुळे अनेक खरे सेवेकरीदेखील फसले आहेत.